Mahesh Bhatt - Jagjit Singh : बॉलिवूडचे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. त्यासोबत त्यांनी अनेक कलाकारांना मोठा ब्रेक दिला आहे. महेश भट्ट हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की लोकप्रिय गायक जगजीत सिंह यांनी त्यांच्या मुलाचं पार्थीव मिळावं यासाठी पोलिसांना लाच दिली होती.
खरंतर 1990 मध्ये जगजीत सिंग यांच्या मुलाचे निधन झाले होते. एका कार अपघातामध्ये त्यांच्या 20 वर्षांच्या मुलाचे निधन झाले होते. मुलाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर जगजीत सिंह यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यांनी हिंमत्त धरली आणि मुलाच्या पार्थीव आणायला गेले. दरम्यान, महेश भट्ट यांनी केलेल्या दाव्यानुसार जगजीत यांना त्यांच्या मुलाचे पार्थीव तेव्हा मिळाले जेव्हा त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला लाच दिली.
इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या रिपोर्टनुसार, महेश भट्ट यांनी या मुलाखतीत अनुपम खेर यांना सांगितलं. जेव्हा जगजीत सिंग यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांना त्यांच्या मुलाचं पार्थीव घेण्यासाठी ज्यूनियर ऑफिसर्सला लाच द्यावी लागली होती. या घटनेनंतर त्यांना एक गोष्ट कळली की 'सारांश' चं काय महत्त्व आहे. त्यांना ही गोष्ट कळली की कशा प्रकारे एक व्यक्तीला त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या व्यक्तीचं पार्थीव मिळवण्यासाठी स्ट्रगल करावं लागलं", असं महेश भट्ट म्हणाले.
मुलाच्या निधनाची बाचमी ऐकल्यानंतर जगजीत यांची पत्नी चित्रा सिंह यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्या लोकप्रिय गायिका होत्या. मात्र, मुलाच्या निधनानंतर त्यांनी गाणं गाणं बंद केलं. मुलाच्या निधनानंतर चित्रा या फक्त त्यांच्या मुलीसाठी जगत होत्या. मात्र, 2009 मध्ये त्यांची मुलगी म्हणजे मोनिकाचे निधनं झाले. मोनिका विषयी सांगायचे झाले तर मोनिका ही जगजीत आणि चित्रा यांची लेक नाही तर चित्रा यांचे पहिले पती देबो प्रसाद दत्ता यांची मुलगी आहे.
दरम्यान, मंगळवारी 'सारांश' या चित्रपटाला 40 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं महेश भट्ट यांनी अनुपम खेर यांना ही बातमी सांगितली होती. महेश भट्ट यांच्या या चित्रपटात अनुपम खेर यांच्याशिवाय रोहणी हटंगडी महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. या चित्रपटाची पटकथा एका मराठी जोडप्यावर आधारीत होती जे त्यांच्या एकूलत्या एक मुलाला गमावतात.