'या' कारणाने झाला 'भाभीजी घर पे हैं' मालिकेतील दिपेश भानचा मृत्यू, अभिनेत्याने केला खुलासा

अभिनेता दीपेश भान यांचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. 

Updated: Jul 24, 2022, 03:14 PM IST
'या' कारणाने झाला 'भाभीजी घर पे हैं' मालिकेतील दिपेश भानचा मृत्यू, अभिनेत्याने केला खुलासा title=

Bhabhiji Ghar Par Hai: 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेतील अभिनेत्याचे नुकतेच निधन झाले. अभिनेता दीपेश भान यांचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटुंबीय आणि सहकलाकारांना धक्का बसला आहे. त्यांचे वय हे 40 एवढे होते. समोर आलेल्या माहितीनूसार त्यांचा मृत्यू हा क्रिकेट खेळताना झाला होता आणि चक्क हा दावा त्यांचे सहकलाकार आसिफ शेख यांनी केला आहे. 

आसिफ शेख आणि दीपेश भान हे 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेत सुरूवातीपासूनच एकत्र आहेत. आपल्या सहकलाकाराच्या निधनाने आसिफ शेख यांना दुःख झाले असून त्यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. आसिफ यांनी सांगितले की, दीपेश भान हे त्यांच्या शरीराला योग्य नसतानाही 3 तास जिममध्ये व्यायाम करायचे. त्यांचे वयही पाहता त्यांच्यासाठी हे फारसे गरजेचे नव्हते. 

एका मुलाखती दरम्यान दीपेश भान यांच्या मृत्यूबद्दल आसिफ शेख यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, ''त्यांचे वय हे फार नव्हते. पण तरीही ते जीममध्ये खूप जास्त वर्क आऊट करायचे आणि आपल्या शरीराची अधिक मेहनत घ्यायचे. सिरियलच्या सुरूवातीला ते फारच तंदुरूस्त होते पण नंतर त्यांचे वजन वाढले आणि ते कमी करण्यासाठी त्यांनी जीमला जवळ केले. आपण तीन तास सलग जीम करतो हेही त्यांना दाखवयाचे होते. आम्ही त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की कशाप्रकारे या सगळ्याची फार गरज नाही, पण त्याने ऐकले नाही. त्याने मला हेही सांगितले होते की तो रात्रीचे जेवणही स्किप करायचा.''

कालच आलेल्या बातमीनुसार दिपेश यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेजने झाला. त्यांच्या डोळ्यांतून रक्तस्राव होत होता. आसिफ म्हणाले की, ''जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी उठते तेव्हा त्याचा रक्तदाब कमी होतो. दीपेश हे सकाळी त्याचा वर्कआउट करायचा आणि त्यादिवशीही त्याने सकाळी वर्कआऊट केले होते आणि नंतर तो क्रिकेट खेळायला गेला होता. त्यांचा गेम खुप चांगला चालू होता परंतु जेव्हा तो खाली पडलेली आपली कॅप घेण्यासाठी खाली वाकला तेव्हा तो कोसळला. आम्ही त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. पण त्याला तिथेच मृत घोषित करण्यात आले होते.''

दीपेश भान यांच्यामागे त्यांची पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार संध्याकाळी उशिरा झाले.