मुंबई : कोरोना विषाणूमुळे उदभवलेली आव्हानात्मक परिस्थिती असतानाच तिथे एका लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्यालाहा काही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयू कक्षात दाखल केलेल्या आशिष रॉय या अभिनेत्यावर सध्या डायलिसिस सुरु आहे. पण, यावेळीय त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. ज्यासाठी अखेर आशिषने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचं आवाहन केलं आहे.
टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध चेहऱ्यापुढे अशी वेळ येणं अनेकांनाच विदारक परिस्थितीविषयी माहिती देऊन जात आहे. हल्लीच अभिनेता टेलिव्हिजन अभिनेता मनमीत ग्रेवालने बेरोजगारी आणि कर्जतबाजारीपणामुळं आत्महत्येचा पर्याय निवडला होता. त्यामागोमागच आता आशिष रॉयपुढे ओढावलेली ही परिस्थिती पाहता, कलाविश्वातील एक वेगळं वास्तव सर्वांपुढे आणत आहे.
'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'ससुराल सिमर का', 'मेरे अंगने मे' आणि अशा कित्येक मालिकांमध्ये आशिषचा अभिनय पाहायला मिळाला आहे. पण, आता मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याला जीवनातील अतिशय कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागत आहे.
सोमवारीच आशिषने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून एक पोस्ट करत आपल्या प्रकृतीविषयी चाहत्यांना माहिती दिली. यानंतर त्याने आणखी एक पोस्ट करत डायलिसिससाठी आपल्याला आर्थिक मदतीची गरज असल्याचा आर्जवी सूर आळवला.
आशिषच्या या पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी कमेंट करत चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. काहींनी पुढाकार घेत त्याला मदत करण्याचीही तयारी दाखवली. तर, काहींनी त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. त्यांच्यासह स्क्रीन शेअर केलेल्या काही कलाकारांनीही कमेंट केल्याचं पाहायला मिळालं.
मागील वर्षी आशिषला अर्थांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून प्रदीर्घ काळासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच त्याला काम मिळणंही बंद झालं. त्याने साठवलेला सर्व पैसा हा उपचारांमध्येच खर्च झाला. त्यामुळं आता आशिष यांना चाहत्यांसोबतच कलावर्तुळातूनही मदत केली जाणं अपेक्षित आहे.
वाचा : दिलासादायक : युरोपातील 'हा' देश कोरोना मुक्त