Ashwini Mahangade : सध्या संपूर्ण देशात निवडणुकीला घेऊन असलेली धावपळ पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच प्रचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी या सगळ्यात सहभाग घेतला आहे. याची सुरुवात ही बॉलिवूड अभिनेता गोविंदाकडून झाली असं म्हणायला हरकत नाही. आता या सगळ्यात अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचा देखील एक व्हिडीओ समोर आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा देत तिनं सभेला हजेरी लावली आहे. त्याशिवाय तिनं स्टेजवर येऊन भाषण देखील केलं. तिच्या भाषणानं लोकांचा उत्साह खूप वाढलाय.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून 'राणु अक्का' म्हणून घराघरात पोहोचलेली अश्विनी महांगडे आता राजकारणच्या मैदानात आपल्या सगळ्यांना दिसली. परवा म्हणजे 30 एप्रिल रोजी अश्विनीनं साताऱ्यात झालेल्या शरद पवारांच्या सभेत हजेरी लावली होती. या सभेत शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेते देखील त्यावेळी उपस्थित होते. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात अश्विनी बोलताना दिसते की "राजकारण ही फक्त अभ्यासाची गोष्ट नाही तर त्यासोबत प्रॅक्टिकल नॉलेज फार महत्त्वाचं असतं हे शिकवणारे आपल्या सगळ्यांचे नेते म्हणजे माननीय पवार साहेब. पण इतिहासाची पानं जेव्हा जेव्हा उघडली जातील तेव्हा तेव्हा सुवर्णा अक्षरात लिहिला जाईल आणि जो आपल्या सगळ्यांकडून वाचला जाईल आणि तो म्हणजे निष्ठावंतांचा सातारा. अशाच साताऱ्यात आज माननीय पवार साहेबांनी आपल्याला अतिशय निष्ठावंत उमेदवार आम्हाला दिला आहे. आज शिंदे साहेबांनी हजार काम केली आहेत मी त्यांची गणती करत नाही. पण माझ्यासाठी माझ्या मनात भिडलेलं एक काम आणि मला खऱ्या अर्थानं वाटतंय की आज जेवढे तरुण मुलं इथे उभे आहेत. त्यांनाही त्याचं निश्चितपणे कौतुक वाटत असेल... मराठाआरक्षणाच्या वेळी... मराठाआरक्षण हे नवी मुंबईला धडकलं...ते धडकण्याच्या आधी... आलेल्या प्रत्येक मुलाला, आलेल्या प्रत्येक माणसाल, त्या मराठा आरक्षणामध्ये आलेल्या प्रत्येक महिलेची सुख-सुविधा, तिला तिथे राहण्यासाठीची जागा..., जेवणाचा प्रश्न, हे सगळे प्रश्न कोणी मांडले असतील आणि त्यावर काम केलं असेल तर ते शिंदे साहेबांनी. शेतकऱ्याची लेक आहे, पण शेतकऱ्यांना विचारतंय कोण... तर विचारताय फक्त पवार साहेब..."
त्याशिवाय अश्विनीनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीला शेअर करत अश्विनीनं कॅप्शन दिलं आहे की "माझे वडील कै. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी पाहिले स्वप्नं आणि त्यासाठी फार आधीपासून त्यांनी आम्हा भावंडांना तयार केले. समाजाचे काही देणे लागतो या विचाराने मला जेवढे माझ्या माणसांसाठी काम करता येईल तेवढे मी नक्की करेन."