Samantha Ruth Prabhu Video : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये मागील काही वर्षांत कमालीची प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आता एका नव्या कारणामुळं चर्चेत आली आहे. यावेळी ही अभिनेत्री नजरा वळवण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा आणि वारंवार पाहिला जाणारा तिचा एक व्हिडीओ.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ साधासुधा नसून, त्यामध्ये समंथाची एका खास व्यक्तीसोबतची केमिस्ट्री मनाचा ठाव घेत आहे. या व्यक्तीची समंथाचं असणारं नातं सर्वज्ञात आहे. किंबहुना त्याच्यासाठीही समंथा तितकीच खास आहे. त्या व्यक्तीचं नाव, विजय देवरकोंडा.
अभिनेता विजय देवरकोंडा आणि समंथा ही जोडी पुन्हा एकदा एका चित्रपटातून स्क्रीन शेअर करणार आहेत. सप्टेंबर महिन्यात त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्यापूर्वी त्याच्या प्रसिद्धीच्या निमित्तानं ही जोडगोळी सध्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. हैदराबाद येथे अशाच एका कार्यक्रमादरम्यान समंथा आणि विजयनं हजेरी लावली आणि त्यांनी चित्रपटाच्या शीर्षकगीतावर सुरेख नृत्य सादर केलं. यावेळी त्या दोघांच्या मैत्रीपूर्ण नात्यात असणारा सहजपणा सर्वांनीच पाहिला. समंथा आणि विजयच्या या रोमँटिक नृत्यावर उपस्थितांनीही कमाल प्रतिसाद दिला.
एकमेकांचे हात धरून स्टेजवर येण्यापासून डान्स करणं असो किंवा मग एकमेकांबद्दल कौतुकाचे शब्द बोलणं असो, समंथा आणि विजय या दोघांचंही समीकरण इतकं का गाजतं याचीच प्रचिती सर्वांना आली. सोशल मीडियावर रील्स आणि शॉर्ट्सच्या माध्यमातून अनेकांनीच त्यांच्या नृत्याचे व्हिडीओ शेअर केले. असंख्य नेटकऱ्यांनी ते पाहिले आणि शेअरही केले. यानिमित्तानं पुन्हा एकदा समंथा आणि विजयच्या मैत्रीचंही कौतुक झालं.
मागील दीड-दोन वर्षे समंथासाठी आव्हानात्मक ठरली आहेत. जवळपास चार वर्षांच्या वैवाहित नात्याला पूर्णविराम देत अभिनेता नागा चैतन्य आणि तिनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात तिला एका दुर्धर आजारानं ग्रासलं, ज्यातूनही ती मोठ्या जिद्दीनं सावरली. ज्यानंतर आता हीच समंथा तिच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे. ध्यानधारणा, योग, आहार यासोबतच विविध ठिकाणी भटकंती करण्यालाही ती प्राधान्य देताना दिसत आहे.