मुंबई : सोनम कपूर ही तशी नेहमीच अभिनय आणि आपल्या खास स्टाईलमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री. सध्या ती तिच्या 'पॅडमॅन' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. प्रमोशन दरम्यान ती प्रसारमाध्यमांशी बोलत आहे. बोलताना तिने आपल्या मासिक पाळीबाबतच्या (पिरियड्स) अनुभवावर खुलेआम भाष्य केले आहे.
सोनम सांगते की, वयाच्या १५व्या वर्षी तिला मासिक पाळी सुरू झाली. पण, तिच्या काही मैत्रिणींना मात्र, १३ ते १४ या वयातच मासिक पाळी सुरू झाली होती. त्यामुळे आपल्या पाळीत काही गडबड तर नाही ना? अशी शंका सोनमला सतावात असे. त्यामुळे कधी कधी तणावात येऊन आपण आईलाही त्याबाबत विचारायचो, असे सोनम कपूर सांगते. 'पॅडमॅन' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, 'नवभारतटाइम्स डॉट कॉम'ला दिलेल्या मुलाखतीत सोनम कपूरने ही माहिती दिली आहे.
सोनम पुढे सांगते की, माझ्या सर्व मैत्रिणींना मासिक पाळी सुरू झाली होती. केवळ, मलाच एकटीला ती सुरू झाली नव्हती. त्यामुळे मला त्याबाबत प्रचंड उत्सुकता होती. मात्र, ती काही येत नव्हती. त्यामुळे अनेकदा माझ्या मनात गैरसमज निर्माण व्हायचा. मी निराशही व्हायचे. मग मी आईला विचारायचे माझ्यासोबत काही गडबड तर होत नाही ना. माझ्या या प्रश्नावर आई मला समजावून सांगायची. आई म्हणायची, 'यात नाराज होण्याचे काहीच कारण नाही. काही मुलींना मासिक पाळी उशीरा सुरू होते. हे पूर्ण नैसर्गिक आहे. त्यात नाराज होण्याचे किंवा घाबरण्याचे काहीच कारण नाही.
मी जेव्हा १४ वर्षांची होते तेव्हा माझी उंची ५-१ होती. तर, मी १५ वर्षांची झाले तेव्हा माझी उंची ५-९ इतकी झाली. मला मी १५ वर्षाची असल्यादरम्यानच मासिक पाळी सुरू झाली.
माझ्या मैत्रिणी अनेकदा मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासाबद्दल बोलत असत. पण, मला पाळीच सुरू न झाल्याने मी काहीच बोलत नसे. अनेकदा मी ती चर्चाच टाळायचे. कारण, मला त्या त्रासबद्दल काहीच माहिती नव्हते. तसेच, त्या काळात सॅनिटरी नॅपकीन कसे वापरायचे. कोणत्या प्रकारचे वापरायचे. याबाबत त्या बोलत असत. पण, ही चर्चा ऐकूण मला मी या वर्तुळाच्या बाहेरची असल्यासारखे वाटायचे. पण, एकदाची मला पाळी सुरू झाली आणि मी या चर्चेत सहभागी होऊ लागली, असेही सोनम सांगते. चित्रपटाबाबत बोलताना सोनम सांगते, 'पॅडमॅन'मध्ये जो मुद्दा उचलला आहे तो अत्यांत वेगळा आणि खास आहे. जो मांडणे जरूरीचे होते.
'पॅडमॅन' चित्रपटात सोनम कपूरसोबतच अक्षय कुमार आणि राधिका आपटे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाची निर्मीतीत आर बल्की यानी केली आहे. तर, अमित त्रिवेदी यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.