मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 70 चं दशक गाजवणाऱ्या परवीन बाबी यांच्या निधनाला तब्बल 17 वर्षे उलटून गेली. परवीन बाबी यांच्या जीवनाची अखेर अतिशय हृदयद्रावक पद्धतीनं झाली. संशयास्पद अवस्थेत या अभिनेत्रीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला होता. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानं जेव्हा त्यांच्या घराबाहेर दोन दिवसांपूर्वीचं दूध आणि पेपर पाहिले तेव्हा पोलिसांना याची माहिती दिली.
परवीन यांच्या जीवनात हे वळण आलेलं असताना कोणीही त्यांच्यासोबत नव्हतं. वैयक्तिक आयुष्यात या अभिनेत्रीला कायम निराशेचाच सामना करावा लागला.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या 'दिवार' या चित्रपटानं त्यांना कमालीची लोकप्रियता दिली. तिथेच त्यांचं प्रेमप्रकरण अभिनेता डॅनी डँझोपा यांच्याशी सुरु झालं.
काही दिवसांतच या नात्याचा पूर्णविराम मिळाला. डॅनी यांच्यासोबत नातं तुटल्यानंतर अभिनेता कबीर बेदी परवीन यांच्या आयुष्यात आले.
कबीर मॉडर्न विचारांचे असल्यामुळं परवीनशी त्यांचं सुत अतिशय सहजपणे जुळलं. या दोघांनाही एकमेकांची साथ आवडू लागली.
बराच काळ हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. पण, लग्नापर्यंत पोहोचण्याआधीच हे नातं तुटलं.
पुढे दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत परवीन रिलेशनशिपमध्ये होत्या. तीन वर्षे त्यांचं हे नातं चाललं. तेव्हा महेश विवाहित होते.
परवीनचा मात्र नुकताच ब्रेकअप झाला होता. कबीरपासूनच्या दुराव्यातून त्या सावरत होत्या, की महेश भट्ट यांच्याशी त्यांची जवळीक वाढली.
परवीन बाबी भट्ट यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. पण, मद्यपान, सिगरेट आणि वाईट सवयींमुळे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं.
सिजोफ्रेनिया नामक आजारानं त्यांना गाठलं. हा एक अनुवांशिक आजार होता. ज्याचे उपचार अशक्य होते. परवीन यांना मधुमेह आणि गँगरिनही झालं.
आजारपणामुळं महेश भट्ट यांनी परवीन यांची साथ सोडली.
रुपेरी पडद्यावर पाहताना परवीन बाबी यांचं आयुष्य फारच लखलखाटाचं वाटलं. पण, वास्तविक मात्र त्यांच्या आयुष्यात कधी कोणाची कायमस्वरुपी साथ मिळालीच नाही.
शेवटच्या श्वासापर्यंत ही अभिनेत्री खऱ्या प्रेमासाठी आसुसलेली राहिली आणि यातच तिचा करुण अंत झाला.