मुंबई : अजय देवगनची मुख्य भूमिका असणाऱ्या 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनीच त्याची प्रशंसा केली. तर, काहींनी त्याविरोधात नाराजीचा सूर आळवला. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश आहे.
ट्विटरच्या माध्यमातून आव्हाडांनी दिग्दर्शक ओम राऊत यांना एक इशाराच दिला. मुख्य म्हणजे '...याला धमकी समजली तरी चालेल', असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. 'ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्ययथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष द्यावे लागेल. याला धमकी समजली तरी चालेल', असं ट्विट त्यांनी केलं.
आव्हाडांच्या या ट्विटवर एकिकडे ट्विटरवर प्रतिक्रिया उमटू लागल्या तोच, सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शकाने सादर केलेल्या या कलाकृतीला प्रदर्शित होण्यापूर्वीच विरोधाचा सामना करावा लागत आहे.
'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्यांमधीलच एक असणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. यामध्ये शिवकालीन कालखंड साकारण्यासाठी दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमनेच काही बारकावे टीपल्याचं काही मिनिटांच्या ट्रेलरमधून लक्षात आलं. आता ऐतिहासिक घटनांचा संदर्भ आणि प्रसंग पाहता चित्रपटातील काही गोष्टींबाबत मात्र नकारात्मक सूर आळवण्यात येत आहे. त्यामुळे आता तान्हाजीवरुन सुरु झालेला हा वाद पुढे कोणत्या वळणावर पोहोचणार की इथेच वादाला पूर्णविराम मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.