Govinda Misfiring: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अभिनेता गोविंदाचा (Govinda) जबाब नोंदवला आहे. मात्र पोलीस त्याच्या जबाबावर समाधानी नाहीत. गोविंदा काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. गोविंदाला अनेक प्रश्नांची नीत उत्तरं देता येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलीस या प्रकरणात सध्या तज्ज्ञांची मदत घेत आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा गोविंदाचा जबाब नोंदवू शकतात.
खाली पडल्यानंतर रिव्हॉल्व्हरने ट्रिगर कसे केले हा मोठा प्रश्न आहे. खाली पडल्यावर रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर दाबला गेल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रश्नावर गोविंदाच्या उत्तराने पोलिसांचे समाधान झालेले नाही. इतर अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांना मिळत नाहीत. उदाहरणार्थ दुर्घटनेच्या वेळी गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमध्ये 6 गोळ्या होत्या, त्यापैकी एक गोळी सुटली. तो शस्त्र घरीच सोडून जाणार होता तर त्याने रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या का भरल्या? त्याने रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या का बाहेर ठेवल्या नाहीत?
गोविंदा दुर्घटनेशी संबंधित काही महत्त्वाची माहिती त्यांच्यापासून लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पंचनामाद्वारे सर्व काही उघड होऊ शकतं. घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्ये यासंदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांना आहे. मंगळवारी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत पंचनामा झाला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस तज्ज्ञांचीही मदत घेत आहेत. गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर या प्रश्नांबाबत पोलीस पुन्हा एकदा त्याचा जबाब नोंदवू शकतात.
गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 4.45 च्या सुमारास तो एका शोसाठी कोलकाता येथे 6 वाजताचे फ्लाइट पकडण्यासाठी घरातून निघणार होता. अभिनेता परवानाधारक रिव्हॉल्वर कपाटात ठेवत असताना ट्रिगर चुकून ढकलला गेला. त्यानंतर एक गोळी त्याच्या पायाला लागली.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासात गोविंदाने एक ऑडिओ क्लिप जारी करून त्याच्या चाहत्यांना त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली. "माझे चाहते, माझे आई-वडील आणि देव यांच्या आशीर्वादाने, मी आता चांगली स्थितीत आहे. मला गोळी लागली होती, जी आता काढण्यात आली आहे. मी येथील डॉक्टर डॉ अग्रवाल यांचे आभार मानतो. तुमच्या प्रार्थनेबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. "असं अभिनेता म्हणाला.
डॉक्टर अग्रवाल यांनी मीडियाशी संवाद साधताना सध्याची त्याची प्रकृती स्थिर असून 8 ते 10 टाके लावल्याचं सांगितलं आहे. 5 वाजता ते माझ्याकडे आले होते. 6 वाजता आम्ही त्यांच्यावर उपचार केले. यामध्ये जवळपास दीड तास गेले अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान गोविंदाला डिस्चार्ज कधी देणार असं विचारण्यात आलं असता डॉक्टर म्हणाले, फार लवकर दिला जाईल, कदाचित दोन दिवस लागतील. गोविंदाला नेमकी जखम कुठे झाली आहे असं विचारलं असता त्यांनी गुडघ्याच्या दोन इंच खाली असं उत्तर दिलं.