Vedat Marathe Veer Daudale Saat set Accident : दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे सध्या त्यांच्या 'वेडात मराठी वीर जोडले सात' (Vedat Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटाच्या चित्रीकरणार व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी एक मोठा अपघात झाला आहे. तटबंदीवरून एक 19 वर्षीय मुलगा 100 फूट खाली कोसळला. हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्या तरुणाचा हा अपघात झाला आहे त्याचे नाव नागेश खोबरे असे आहे.
नागेशचा शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास हा अपघात झाला होता. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर हे त्यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे पन्हाळगडावर चित्रीकरण करत आहेत. दरम्यान, काल रात्री पावणे नऊच्या सुमारास पन्हाळगडावरील सज्जा कोटी येथील तटबंदीवर चित्रीकरण सुरू असताना नागेशचा तोल गेला आणि तो 100 फूट खाली जाऊन कोसळला.
पन्हाळगडावर चित्रीकरण करण्यासाठी तिथे घोडे आणले होते. नागेश हा घोड्यांची देखरेख करण्यासाठी तिथे होता. यादरम्यान, नागेश हा फोनवर सुरु असलेलं त्याचं बोलणं संपवत सज्जा कोटीच्या उत्तर बाजूच्या तटबंदीवरून खाली जात होता आणि त्यावेळीच त्याचा तोल गेला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच त्याच्या मदतीसाठी दोर सोडत त्याच्या मदतीनं खाली गेले. त्यानंतर नागेशला बांधून वर आणण्यात आले. या अपघातानंतर नागेशच्या डोक्याला आणि छातीला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर लगेचच नागेशला कोल्हापूर येथील सी. पी. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नागेशची स्थिती गंभीर असल्याचे पाहता त्याला एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. नागेशच्या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पन्हाळा पोलीस घटनास्थळी पोहोचले.मात्र, या संपूर्ण घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा : Madhuri Dixit Troll : माधुरी तुला हे शोभतं का? आईच्या शोकसभेत मेकअप केल्यामुळे धक् धक् गर्ल ट्रोल
दरम्यान, 'वेडात मराठी वीर जोडले सात' या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. या चित्रपटातील कलाकारांची भूमिका आणि त्यांच्या पोशाखावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील दिसणार आहे.