मुंबई : भारताच्या स्वातंत्र्यलढाच्याचा इतिहास कोणीही विसरलेलं नाही. असंख्य प्राणांची आहूती दिली तेव्हा कुठे देशाने मोकळा श्वास घेतला. परकियांच्या ताब्यात, त्यांच्या जाचक नियमांच्या विळख्यात असणाऱ्या या देशाच्या स्वातंत्र्याच्या रणसंग्रामातील एक तळपतं नाव म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं. 'मै मेरी झाँसी नही दूँगी', असं म्हणत ज्या आत्मविश्वासाने राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांना ललकारलं होतं, त्याच अद्वितीय व्यक्तीमत्त्वाचं आयुष्य एका चित्रपटातून उलगडलं जाणार आहे.
अभिनेत्री कंगना रणौत हिची मुख्य भूमिका असणाऱ्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'बाहुबली' आणि 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटांच्या लेखकांच्या लेखणीतून साकारलेला 'मणिकर्णिका...'चा हा ट्रेलर अवघ्या काही मिनिटांमध्येही चित्रपटाचा थरार नेमका कसा असेल याची कल्पना देत आहे.
कंगनाचा अभिनय, सहकलाकारांची साथ, तगडे संवाद आणि भव्य सेट असं सारं गणित जुळून आलं असून, कथानक साकारत दिग्दर्शकाने घेतलेली मेहनतही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. महिला सक्षमीकरणाचा मुद्दा हा पूर्वापार चालत आलेला असून त्याच्याकडे पाहण्याचे दृष्टीकोन आणि परिस्थिती तेवढी बदलली आहे हे ट्रेलर पाहता लक्षात येतं.
कंगनाने ज्या कौशल्याने राणी लक्ष्मीबाई यांचं पात्र साकारलं आहे ते पाहता तिचा लूक आणि अभिनयाची अनेकांनीच प्रशंसा केली आहे. अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडे यांसह इतरही सहकलाकारांचा अभिनय या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. एक आई, योद्धा, मुलगी ज्यावेळी जिद्दीला पेटते तेव्हा ती सर्वांच्या वरचढ ठरते याची प्रतिची ट्रेलर पाहताना लक्षात येत आहे. 'आपको राज करना है और मुझे अपनोंकी सेवा', असं म्हणणाऱ्या झाशीच्या राणीची संघर्षगाथा आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का हे २५ जानेवारी २०१९ नंतरच स्पष्ट होणार आहे.