नवरात्रीनिमित्त (Navaratri) देशभरात गरब्याचे (Garba) आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, गरब्यात मुस्लिमांच्या (Muslim) प्रवेशावरून वाद वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यावर आता अभिनेत्री गौहर खानने (gauhar khan) भाष्य केले आहे.
गौहर खानने (gauhar khan) एका चॅनलचा व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. हा अजेंडा भयानक आहे. यातून द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. मुस्लिमांना गरब्याला उपस्थित राहण्याची परवानगी नसेल तर सरकारने तशी घोषणा करावी, असे गौहर खानने म्हटलं आहे.
"सरकारने जाहीर करुन टाकावं की मुस्लिमांनी गरबा कार्यक्रमांपासून दूर राहावे कारण हा धार्मिक कार्यक्रम आहे. मला खात्री आहे की सर्व मुस्लिम त्याचा आदर करतील. पण अशा घाणेरड्या अजेंड्यात त्याचा समावेश करणे भयंकर आहे. यामधून द्वेष पसरवला जात आहे. अशा अजेंड्याची लाज वाटते," असे गौहर खानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, गुजरात, मध्य प्रदेश याठिकाणी गरब्यामध्ये मुस्लिम तरुणांनी प्रवेश करण्यावरुन मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी मुस्लिम तरुणांना काही हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. कोविडमुळे दोन वर्षांनंतर देशभरात नवरात्री आणि गरबा आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, गुजरातमध्ये अनेक ठिकाणी गरब्यात मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावर काही संघटनांनी बंदी घातली आहे.