Ram Gopal Verma Arrest Warrant: अनेकदा आपल्या विधानांमुळे वादात अडकलेला प्रसिद्ध चित्रपट निर्माता राम गोपाल वर्माला मुंबईतील न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणी तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे 7 वर्षांपासून सुरु असलेली कायदेशीर लढाई संपुष्टात आली आहे. निर्माते राम गोपाल वर्मा याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. मात्र, सुनावणी दरम्यान राम गोपाल वर्मा न्यायालयात हजर नव्हता. त्यामुळे न्यायाधीशांनी त्याच्या अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यासोबतच याचिकाकर्त्याला तीन महिन्यांमध्ये 3.72 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
राम गोपाल वर्मा याला भारतीय दंड संहितेच्या कलम 138 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. चेकवर निधीची कमतरता किंवा विहित रक्कमेपेक्षा जास्त धनादेश बाऊन्स होणे या कलमाखाली हा दंडनीय गुन्हा आहे.
नेमकं प्रकरण काय?
निर्माते राम गोपाल वर्मा याला तीन महिन्यांत तक्रारदाराला 3.72 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अन्यथा त्याला आणखी तीन महिन्यांची साधी शिक्षा भोगावी लागेल. हे चेक बाऊन्स प्रकरण 2018 मध्ये महेशचंद्र मिश्रा यांच्या वतीने श्री नावाच्या कंपनीने दाखल केले होते. हे प्रकरण राम गोपाल वर्मा याच्या फर्मविरुद्ध होते. 'सत्या', 'रंगीला', 'कंपनी' आणि 'सरकार' यांसारख्या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवणारे राम गोपाल वर्मा बऱ्याच दिवसांपासून अॅक्टिव्ह नाहीये.
न्यायालयाने दोषी ठरवत सुनावली शिक्षा
कोविड-19 महामारीच्या काळात त्याला त्याचे कार्यालय विकावे लागले. या प्रकरणात जून 2022 मध्ये न्यायालयाने राम गोपाल वर्मा याला रोख 5 हजार रुपयांच्या सुरक्षा आणि पीआरवर जामीन मंजूर केला आहे. मंगळवारी न्यायालयाने शिक्षा सुनावताना न्यायदंडाधिकारी वायपी पुजारी म्हणाले की, खटला सुरू असताना आरोपींनी कोठडीत वेळ घालवला नाही म्हणून सेट ऑफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, न्यायालयाचा पूर्ण निर्णय आणि चर्चेच्या नोट्स अद्याप प्रसिद्ध झालेल्या नाहीत.