पुन्हा होता येणार सुवर्ण क्षणांचा साक्षीदार, 'मानापमान' नाटक लवकरच रंगभूमीवर

Entertainment :  स्वर्गीय बालगंधर्व आणि स्वर्गीय केशवराव भोसले यांनी एकत्र येऊन केलेला संगीत संयुक्त 'मानापमान' या नाटकाचा नव्याने प्रयोग, लवकरच हे नाटक येणार रंगभूमीवर

Updated: Jul 9, 2024, 10:51 PM IST
पुन्हा होता येणार सुवर्ण क्षणांचा साक्षीदार, 'मानापमान' नाटक लवकरच रंगभूमीवर title=

Entertainment : मराठी रंगभूमीचा इतिहास आता 180 वर्षांचा झालेला आहे. रंगभूमीचा हा प्रदीर्घ इतिहास हजारो लाखो सुवर्ण क्षणांचा साक्षीदार आहे. या सुवर्णक्षणांच्या भांडारात असंख्य मौल्यवान घटना, प्रसंग सामावलेले आहेत. त्यातीतलच रंगभूमीचे दोन अद्वितीय तारे म्हणजे स्वर्गीय बालगंधर्व (Bal Gandharva) आणि स्वर्गीय केशवराव भोसले (Keshavrao Bhosale) यांनी एकत्र येऊन केलेला संयुक्त 'मानापमान' (Manapaman) या नाटकाचा प्रयोग. हा प्रयोग होण्यामागे तत्कालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडीच नव्हे तर कलाजीवनाचे आणि कलावंताच्या माणुसकीचं भव्य दर्शन आपल्याला घडतं.

याच घटनेवर आधारित अथर्व थिएटर्सच्या वतीने 5 जुलैला विलेपार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह तालीम हॉलमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनयसम्राट अशोक सराफ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संयुक्त मानापमान नाटकाचा मुहर्त करण्यात आला. यावेळी नाटकाचे निर्माते संतोष काणेकर, लेखक अभिराम भडकमकर,दिग्दर्शक हृषिकेश जोशी,नाटकातील कलाकार मंडळी आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. यावेळी बोलताना अशोक सराफ यांनी संयुक्त मानापमान हे रंगभूमीवरील अतिशय महत्वाचं नाटक आहे आणि या नाटकाची पुन्हा निर्मिती करण्याबाबत निर्मात्यांचे धन्यवाद मानले.

अश्या प्रकारची संगीत नाटकं येणं ही काळाची गरज आहे असंही यावेळी अशोक सराफांनी आपले विचार मांडतांना सांगितले, नवीन कलाकारांची फौज घेऊन आपण हे नाटक रंगभूमीवर घेऊन येत असून,आजच्या पिढीला संगीत नाटकाच्या सुवर्णयुगातील संगीताचा साज कळण्यासाठी आपण या नाटकाला पुन्हा रंगभूमीवर घेऊन येत आहोत असं या नाटकाचे दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी सांगितलं. संगीत नाटकाला प्रेक्षक येत नाहीत असा गैरसमज आहे. आपण जर दर्जेदार रंगावृत्ती रंगभूमीवर आणली तर दर्दी रसिक नक्कीच अश्या नाटकांना गर्दीरूपी आर्शिवाद देतात असा विश्वास संगीत मानापमान नाटकाचे निर्माते संतोष काणेकर यांनी व्यक्त केला. लवकरच हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.