मुंबई : ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच काही वादांमध्ये अडकलेल्या आणि मुख्य भूमिकांमधील अभिनेत्रींमुळे चर्चेत असणाऱ्या 'सांड की आँख' या चित्रपतील गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. एक महिला म्हणूनही समाजाने आखलेल्या चौकटीत न राहता, जगण्याचा खरा आनंद घेणं म्हणजे काय असतं याची झलक या गाण्यातून पाहायला मिळत आहे.
वुमनिया असे बोल असणाऱ्या गाण्याला 'ढासू' म्हणण्याचं कारण, गाण्याच्या सुरुवातीलाच लक्षात येतं. पुरुषांची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी म्हणून कंबर कसणाऱ्या दोन असामान्य महिलांचा डॅशिंग अंदाज या गाण्यातून पाहायला मिळत आहे.
तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. ज्यामध्ये त्या दोघीही आपआपल्या वाट्याला आलेल्या पात्रांच्या तरुणपणातील रुपात दिसत आहेत. मुख्य म्हणजे त्यांचा हा अंदाज विशेष लक्ष वेधून जात आहे. राज शेखरने लिहिलेल्या या गाण्याला विशाल मिश्राचं संगीत आहे. हे विशाल ददलानी आणि विशाल मिश्राने गायलं आहे.
चित्रपटातील हे गीत आणि काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहता, बॉक्स ऑफिसवर कमाईचा नेम साधण्यात ही जोडी यशस्वी ठरते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित आणि अनुराग कश्यपची निर्मिती असणारा हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. विनीत कुमार आणि प्रकाश झा हेसुद्धा या चित्रपटातून झळकणार आहेत. भारतातील वयोवृद्ध नेमबाज जोडी, चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनातील काही प्रसंगांचा आधार घेत हा चित्रपट साकारण्यात आला आहे.