मुंबई : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असणारा 'गदर' हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली असली तरीही या चित्रपटाची जादू काही कमी झालेली नाहीत. चित्रपटातील गाण्यांपासून त्यातील प्रत्येक संवादापर्यत सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या मनात घर करुन होत्या. भारत- पाकिस्तान या दोन देशांतील संबंध, फाळणी आणि त्याभोवती फिरणारी एक प्रेमकहाणी असं एकंदर कथानक या चित्रपटातून साकारण्यात आलं होतं. अशा या प्रेमकहाणीचा पुढचा भाग अर्थात 'गदर'चा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाल्याचं कळत आहे.
अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर' हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीतही गणला जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. याचविषयी चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेशी संबंधित काही अधिकृत सूत्रांनी माहिती दिली. गेल्या पंधरा वर्षांपासून गदरच्या सिक्वलवर काम सुरु असून तारा (सनी देओल), सकीना (अमिषा पटेल) आणि जीत (तारा- सकीना यांचा मुलगा) यांची कथा त्यातून साकारण्यात येणार आहे. भारत- पाकिस्तान संबंधांची जोड त्याला असेल, किंबहुना त्याशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नसल्याची माहिती त्यांनी दिली. सध्याच्या घडीला याविषयीची कोणतीही माहिती उघड करता येणार नसल्याचं सांगत चित्रपटाची स्टारकास्ट कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दोन देशांमध्ये असणारे तणावपूर्ण संबंध आणि आता त्यांना मिळालेलील कलाटणी चित्रपटाचं कथानक नेमकं कोणत्या वळणावर आणून ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे कलाविश्वातून आता अभिनेता सनी देओल याने त्याचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. त्यामुळे येत्या काळात तो राजकारण आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांमध्ये समतोल राखण्यात यशस्वी होतो का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.