Panchak Movie : डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांची निर्मिती असलेला 'पंचक' चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिनेप्रेमी 'पंचक'च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रेक्षकांच्या ट्रेलर पसंतीस उतरत असतानाच या चित्रपटाची भुरळ बॉलिवूडच्या कलाकारांनाही पडली आहे. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावरून डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
या सगळ्या सेलिब्रिटींमध्ये काजोल, शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख, करण जोहर, संजय कपूर अशा अनेक नामवंतांनी आपल्या सोशल मीडियावरून ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे. तर प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीतील सह कलाकारांकडून मिळणाऱ्या शुभेच्छांबद्दल माधुरी दीक्षित म्हणाली, ''खूप छान वाटतंय, प्रेक्षकांना, इंडस्ट्रीतील माझ्या मित्र परिवाराला 'पंचक'चा ट्रेलर आवडला. सगळ्यांचे मनापासून आभार. तुमचे प्रेम आमच्या टीमवर सदैव असेच असुद्या. मला खात्री आहे माझा इंडस्ट्रीतील परिवार हा चित्रपट नक्की बघणार. प्रेक्षकांनाही 'पंचक' खूप आवडेल.''
घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले 'पंचक' कसे सुटणार, हे बघताना मजा येणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 5 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत.
हेही वाचा : घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्यानं सोडलं बच्चन कुटुंबियांचं घर?
'पंचक'च्या स्टार कास्ट विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे लिखित 'पंचक'चे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.