मुंबई : यंदाच्या वर्षी बऱ्याच सेलिब्रिटी जोड्या विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत असल्याची चिन्हं होती. अगदी रणबीर- आलियापासून ते वरुण- नताशापर्यंत अनेकांच्या नावांचा या यादीत समावेश होता. पण, कोरोना विषाणूची महामारी धडकली आणि सारं चित्र बदलून गेलं. त्यामुळं या जोड्यांचा प्रवास यंदा कर्तव्य आहे इथपासून यंदा कर्तव्य नाही... इथपर्यंत पोहोचल्याचं कळत आहे. यामध्ये आता आणखी का सेलिब्रिटी जोडीचं नाव जोडलं गेलं आहे. ही जोडी म्हणजे अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल.
कोरोनाच्या आव्हानामुळं आणि त्यामुळं उदभवलेल्या परिस्थितीमुळं रिचा आणि अलीचं एप्रिलमध्ये होणारं लग्न आता पुढे ढकलण्यात आलं आहे. खुद्द रिचानं एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. नव्या जीवनशैलीचा आपण कधीपर्यंत स्वीकार करु शकतो यावरच बहुधा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही लग्नाची तारीख ठरवू असं अलीनं स्पष्ट केलं.
अली आणि रिचानं तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांच्या विवाहसोहळ्याच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा बेत आखला होता. आपल्या जवळच्या व्यक्तींना, पाहुण्यांना प्रवास करावा लागू नये यासाठी या जोडीनं अशी आखणी केली होती. तेव्हा आता विवाहसोहळ्याची तारीख नव्यानं ठरवताना हे कोणत्या ठिकाणांना पसंती देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
रिचा आणि अलीच्या सध्याच्या कारकिर्दीविषयी सांगावं तर, रिचा कंगनासोबतच्या 'पंगा' या चित्रपटातून झळकली होती. तर, अली नेटफ्लिक्स ओरिजिनल 'हाऊस अरेस्ट'मधून झळकला होता. अशी ही आपआपल्या क्षेत्रात सुरेख काम करणारी आणि प्रेमाच्या वाटेवर निघालेली जोडी त्यांच्या या नात्याला नवं नाव कधी देणाक याकडेच चाहत्यांचं लक्ष आहे.