मुंबई : सेलिब्रिटींच्या वर्तुळात त्यांच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांना कायमच कुतूहल वाटत असतं. सेलिब्रिटींची नाती, त्यांचं दैनंदिन आयुष्य असे उत्सुकता आणि कुतूहलाचे अनेक पैलू यात पाहायला मिळतात. सध्या असाच एक अभिनेता त्याच्या बहिणींसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमुळे बहिण- भावाचं हे सुरेख नातं सर्वांसमोर आणलं आहे.
हे नातं चर्चेत येण्यामागचं कारणंही तसंच आहे. कारण, या अभिनेत्याने चक्क त्याच्या पाठीवऱ बहिणींच्या नावाचा टॅट्टू करुन घेतला आहे. बहिणींवरील प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त करणारा हा अभिनेता आहे, अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर. 'मिर्झियाँ' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या हर्षवर्धनला या क्षेत्रात हवातसा सूर गवसलेला नाही. पण, विविध जाहिराती, फोटोशूट आणि इतरही माध्यमांतून तो या क्षेत्रात सक्रीय आहे. सोशल मीडियावरही त्याची बरीच फॅन फॉलोइंग आहे.
हर्षवर्धनच्या लोकप्रियतेचा प्रत्यय हा त्याच्या पोस्टवरील कमेंटमधून आला. त्याच्या बहिणी म्हणजेच अभिनेत्री सोनम कपूर आणि निर्माती रिआ कपूर या दोघींप्रती असणारा आदर आणि प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत पाहता हर्षवर्धनसारखाच भाऊ आपल्यालाही हवा, अशी कमेंट काही युजर्सनी केली. तर, त्याची प्रशंसा करणारेही कमी नव्हते.
हर्षवर्धन येत्या काळात नेमबाज अभिनव बिंद्राच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या एका चित्रपटात मध्यवर्ती भूमिके दिसणार आहे. सध्या तो या चित्रपटावर बरीच मेहनतही घेत आहे. तेव्हा आता या बायोपिकमुळे तो यशस्वी चित्रपटाचा नेम साधतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.