पुणे : लोणावळा येथील 210 एकर जमिनीपैकी 180 जमिनिबाबतचा करार चव्हाट्यावर आला आहे. या वादातून भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि कुटुंबियांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. देओल कुटुंबाने 'एमओयू'प्रमाणे करार करण्याच्या मागणीसाठी हा दावा करण्यात आला असून त्यावर 10 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
धर्मेंद्र, हेमा मालिनी, सनी देओल, बॉबी देओल, ईषा देओल, उषा अजितसिंग देओल, अहाना धर्मेंद्र देओल, प्रकाश देओल, विजयसिंग देओल, अजितसिंग देओल यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात राज्यसभा खासदार संजय काकडेंनी पुणे न्यायालयात धाव घेतली आहे.
180 एकर जागेच्या संदर्भात धर्मेंद्र यांचे कुटुंबीय आणि काकडे यांच्यात व्यवहार झाला होता. त्याप्रमाणे दोघे मिळून सदर जागेवर जे.डब्ल्यू. मेरियट रिसॉर्ट व बंगल्याची स्कीम करणार होते. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे धर्मेंद्रंच्या कुटुंबीयांना पैसे देऊनही जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्यास टाळाटाळ करण्यात आली, असा आरोप खासदार काकडे यांनी केला आहे.
तसेच जे डब्ल्यू मॅरिएटच्या रिसॉर्टमधून मिळणारा नफा हा प्रत्येकी 50 टक्के वाटा घेतला जाणार असल्याच निश्चित करण्यात आलं होतं. तसेच बंगल्यांद्वारे येणाऱ्या उत्पन्नापैकी 30 टक्के देओल कुटुंबाला तर 70 टक्के वाटा कंपनीला मिळणार आहे. मात्र याबाबतच्या करार करण्यास देओल कुटुंब टाळाटाळ करत आहे. याच मागणीसाठी संजय काकडेंनी न्यायालयात धाव घेतली आहे.
एवढंच नव्हे तर 'माझ्यावर काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न ही केला, परंतु सदर व्यवहाराची सगळी कागदपत्रे पाहिल्यावर वरिष्ठ राजकीय नेत्यांनी देखील माझी बाजू योग्य असल्याचं म्हटलं', असा आरोप संजय काकडेंनी केली आहे.