Allu Arjun Arrested: पुष्पा 2 यशाचे नवे रेकॉर्ड रचत असतानाच अल्लु अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. ते म्हणजे 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जून याला अटक करण्यात आली. हैदराबादयेथील एका चित्रपटगृहात पुष्पा-2 या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात महिलेच्या पतीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अल्लू अर्जुनला अटक करण्यात आल्यानंतर चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. नंतर त्याला तेलंगणा उच्च न्यायालयाने 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचकल्यावर अंतरिम जामीन मंजुर केला होता. आज सकाळीच्या सुमारास अल्लु अर्जुन याची सुटकादेखील करण्यात आली. या सर्व प्रकरणानंतर मृत महिलेच्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे.
मयत महिलेचा पती भास्कर याने दिलेल्या माहितीनुसार, संध्या थिएटरमध्ये त्यांच्या मुलाला चित्रपट पाहायचा होता. आम्ही त्या थिएटरमध्ये होतो त्यात अल्लू अर्जूनची चूक नाहीये. मला अल्लू अर्जुनच्या अटकेची माहिती नाही आणि तो अभिनेत्याच्या विरोधातील सर्व तक्रारी मागे घेण्यास तयार आहे.
माध्यमांशी बोलताना त्याने म्हटलं की, 'अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे. चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही. चेंगराचेंगरीच्या घटनेशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही.' तसंच, पोलिसांनी अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत मला कोणतीही माहिती दिली नाही, असंदेखील तो म्हटला आहे.
4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जून आणि पुष्पा-2 ची संपूर्ण टीम हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पोहोचली होती. तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी जमली होती. अल्लू अर्जून आणि इतर कलाकारांना पाहण्यासाठी कलाकारांनी मोठी गर्दी केली होती त्यातच चेंगराचेंगरी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली. यात 35 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेसाठी अल्लू अर्जुन आणि थिएटरचं सगळं काम सांभाळणाऱ्यांवर तक्रार दाखल केली होती. तर ज्या महिलेचं या चिंगराचेंगरीत निधन झाले तिचे नाव रेवती असल्याचं म्हटलं जात आहे. महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध 4 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला.