'हाऊसफुल 5' च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत, डोळ्याला झाली इजा

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. 'हाऊसफुल 5' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करत असताना अक्षय कुमारला डोळ्याला दुखापत झाली आहे.

Intern | Updated: Dec 14, 2024, 04:17 PM IST
'हाऊसफुल 5' च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत, डोळ्याला झाली इजा  title=

'हाऊसफुल 5' या चित्रपटादरम्यान अक्षय कुमारचा अपघात झाला.  या अपघातामुळे डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून सध्या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. हा अपघात चित्रपटाच्या शूटिंगच्या अंतिम टप्प्यात आला आहे.  

अपघात नेमका कसा झाला? 
'हाऊसफुल 5' च्या एका महत्त्वाच्या स्टंट सीनचे चित्रीकरण सुरू होते. त्या दरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्यात काहीतरी गेल्यामुळे त्याला दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर लगेचचं नेत्रतज्ज्ञांना सेटवर बोलावण्यात आले. त्यांनी अक्षयच्या डोळ्यावर उपचार केले आणि त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी डोळ्यावर पट्टी बांधून काही काळ स्क्रीनसमोर काम करू नये असे स्पष्ट केले आहे.  

चित्रपटाच्या सेटवरील इतर कलाकारांचे शूटिंग सुरू आहे. मात्र अक्षयला लवकरात लवकर काम पूर्ण करायचे आहे. चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात असल्याने अक्षयने स्वतःला लवकर बरे करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.  

चित्रपटाची वैशिष्ट्ये आणि कलाकारांची तगडी टीम  
'हाऊसफुल 5' ही बॉलिवूडमधील लोकप्रिय हिट कॉमेडी फ्रेंचायझीचा पाचवा भाग आहे. यावेळी चित्रपटात अक्षय कुमारसोबत रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, फरदीन खान, जॅकलीन फर्नांडीज, सोनम बाजवा, नरगिस फाकरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॉनी लीवर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, चित्रांगदा सिंग, रंजीत, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटात एकूण 18 प्रमुख कलाकार असून, त्यांच्या कॉमेडी टायमिंगने चित्रपटाला आणखी धमाल आणण्याची शक्यता आहे.  

निर्मात्यांच्या माहितीनुसार, 'हाऊसफुल 5' हा या फ्रेंचायझीमधील सर्वाधिक मनोरंजक चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटात हसवणूक करणारे विनोदी प्रसंग, मोठे अ‍ॅक्शन सीन आणि अचूक स्टंट्स आहेत. चित्रपटाची कथा एकाच वेळी विनोदी व गोंधळात टाकणारी असेल असे सांगितले जात आहे.  

चित्रपटाची रिलीज डेट
'हाऊसफुल 5'  6 जून 2025 प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या चाहत्यांना चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचा आनंद घेता येईल. या फ्रेंचायझीचे चाहते मोठ्या उत्सुकतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत, कारण 'हाऊसफुल' फ्रेंचायझीने नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.  

अक्षय कुमारचा चाहत्यांना संदेश 
अपघातानंतर अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना काळजी न करण्याचा संदेश दिला आहे. 'ही दुखापत तितकीशी गंभीर नाही. मी लवकरच बरा होऊन चित्रपटाच्या चित्रीकरणात परत येईन,' असे त्याने सांगितले. चित्रपटाची टीम देखील या परिस्थितीला सकारात्मक दृष्टीने हाताळत असून लवकरच शूटिंग पुन्हा सुरू होईल, असे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले आहे.  

'हाऊसफुल 5' हा चित्रपट धमाल करण्यासाठी सज्ज होत असून, अक्षयच्या अपघातामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.