'आणीबाणी' चित्रपटात प्रवीण तरडे साकारणार अवलिया भूमिका!

Aanibaani Pravin Tarde : प्रवीण तरडे हे लवकरच आणीबाणी या मराठी चित्रपटात दिसणार आहे. आणीबाणी या चित्रपटातील त्यांची पहिल्यांदा वेगळी भूमिका दिसणार आहे. तर या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगत प्रवीण तरडे म्हणाले...

दिक्षा पाटील | Updated: Jul 14, 2023, 02:34 PM IST
'आणीबाणी' चित्रपटात प्रवीण तरडे साकारणार अवलिया भूमिका!  title=
(Photo Credit : PR Handover)

Aanibaani Pravin Tarde : लोकप्रिय मराठमोळे अभिनेते प्रवीण तरडे हे त्यांच्या विविध भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांच्या भूमिका या नेहमीच काही वेगळं शिकवून जातात. प्रवीण तरडे हे फक्त उत्तम अभिनेते नाही तर त्यासोबतच दिग्दर्शक देखील आहेत. लवकरच प्रवीण तरडे ‘आणीबाणी’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना त्यांची एक वेगळीच भूमिका पाहायला मिळणार आहे. त्यांची भूमिका कशी असेल हे जाणून घेण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक आहेत. दरम्यान, नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली की प्रवीन तरडे या चित्रपटात एक कॉमेडी भूमिका साकारणार आहेत. 

प्रत्येक गावात एक अवलिया असतो. गावातल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची बित्तंमबातमी त्याच्याकडे असते. अनेकदा गावात घडणाऱ्या चांगल्या, वाईट घडामोडींनाही तेच जबाबदार असतात. सगळ्यांशी जवळीक असलेल्या पैलवान केशवची मजेशीर व्यक्त्तिरेखा प्रवीण तरडे साकारत आहेत. पाहाता क्षणी हसू येईल अशी केशभूषा आणि वेशभूषा प्रवीण तरडे यांची आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून त्यांची मिश्किल छबी आपल्याला पाहायला मिळते आहे. 
    
आपल्या या नव्या भूमिकेविषयी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, "या भूमिकेने मला आजवर न मिळालेली व्यक्तिरेखा साकारण्‍याची संधी दिली. ‘आणीबाणी’ मध्‍ये उत्तम कलाकार व टीमसोबत काम करण्‍याचा अनुभव खूप छान होता." 

हेही वाचा : Baipan Bhari Deva चित्रपटाचं राज ठाकरे कनेक्शन माहितीये? खुद्द केदार शिंदे यांनीच सांगितलं...

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. छायांकन मंगेश गाडेकर, संकलन प्रमोद कहार, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत. 28 जुलै रोजी ‘आणीबाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दरम्यान, प्रवीण तरडे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वाढते टॉमेटोचे दर पाहता शेतकऱ्यांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी या पोस्टमध्ये "दोन दिवस टोमॅटो महाग झालाय तर मीडियात लईच आग लागलीये.. इथं वर्षभर भाव मिळत नाही म्हणून सडून जातो तेव्हा सगळे गप्पगार.. #लाल चिखल" प्रवीण तरडे हे नेहमीच शेतकऱ्यांच्या सपोर्टमध्ये पुढे येत असल्याचे दिसते.