अजब-गजब : जास्त काम केलं म्हणून कंपनीनं कामावरून काढलं

कंपनीत लवकर आलं किंवा इतरांपेक्षा जास्त काम केलं म्हणून कुणाला कामावरून काढून टाकण्यात आलं... असा किस्सा तुम्ही कधी ऐकला होता का? नाही ना... पण, असं प्रत्यक्षात घडलंय. 

Updated: Nov 1, 2017, 04:54 PM IST
अजब-गजब : जास्त काम केलं म्हणून कंपनीनं कामावरून काढलं

बार्सिलोना : कंपनीत लवकर आलं किंवा इतरांपेक्षा जास्त काम केलं म्हणून कुणाला कामावरून काढून टाकण्यात आलं... असा किस्सा तुम्ही कधी ऐकला होता का? नाही ना... पण, असं प्रत्यक्षात घडलंय. 

बार्सिलोनाच्या 'लिड्ल' नावाच्या एका ग्रोसरी कंपनीनं आपल्या एका कर्मचाऱ्याला तो वेळेपेक्षा लवकर येतो... आणि वेळेपेक्षा जास्त काम करतो म्हणून निलंबित करण्यात आलंय. 

जीन पी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे... कंपनीनं हा निर्णय सुनावल्यानंतर कंपनीसाठी रात्रंदिवस राबणाऱ्या जीन पीसाठी हा एक मोठा धक्काच होता. जीन आपल्या कामाच्या ठिकाणी दररोज सकाळी ५.०० वाजता दाखल होत होता... आणि तेव्हापर्यंत काम करत होता जेव्हापर्यंत इतर सर्व कर्मचारी घरी जात नाहीत...

परंतु, कंपनीला जीन पी याचं हे वर्तन पसंत पडलं नाही. कंपनीचे नियम तोडल्याप्रकरणी जीन पी याला निलंबित करण्यात आलं. यामध्ये कंपनीनं त्याला स्टोअरमध्ये एकटा राहणं आणि मोफत ओव्हरटाईम करण्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवलं. 

कंपनीच्या या निर्णयाविरुद्ध जीन पी यानं कोर्टात धाव घेतलीय. जीन पी याच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, कंपनीनं गेल्या १२ वर्षांत कंपनीत लवकर येण्यापासून रोखलं नव्हतं. जीन पी याच्यावर सेल्स आणि परफॉर्मन्सच्या टार्गेटचा दबाव होता... त्यामुळेच त्यानं आपल्या कामावर मेहनत घेतली, असं वकिलांचं म्हणणं आहे. 

या खटल्यात ट्रिब्युनलचा काय निर्णय असेल? याकडे आता अनेकांचं लक्ष लागलंय.