Satya Nadella on Microsoft Windows Global Outage : जगभरात आयटी क्षेत्र (IT) अर्थात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेकांसाठीच 19 जुलै 2024 ही तारीख मोठ्या आव्हानांची ठरली. मायक्रोसॉफ्टमधील काही तांत्रिक अडचणींमुळं जगभरातील संगणकीय सेवा विस्कळीत झाल्या, कुठं त्या पूर्णपणे थांबल्या आणि एका क्षणात घड्याळाच्या काट्यावर धावत्या जगाचा वेग मंदावला.
मायक्रोसॉफ्ट विंडोजची सेवा ठप्प झाली आणि युजर्ससह याचा थेट परिणाम मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्या बड्या कंपन्यांवरही होताना दिसला. विमानतळांपासून रुग्णालयं, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये सक्रिय असणाऱ्या संस्थांनाही नाईलाजानं काम थांबवावं लागलं. या साऱ्यामागे मुख्य कारण ठरलं ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट क्लाऊडच्या सेवांमध्ये असणारी खराबी.
काय म्हणाले सत्या नडेला?
सोशल मीडियापासून सगळीकडेच मायक्रोसॉफ्टच्या या बिघाडाची चर्चा असताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी Crowdstrike अपडेटमुळं जगभरातील आयटी प्रणालीवर इतका मोठा परिणाम केल्याची बाब स्वीकारली. कंपनी यासंदर्भात क्राऊडस्ट्राईकच्या साथीनं काम करत असल्याचंही ते म्हणाले.
X च्या माध्यमातून त्यांनी झाला तांत्रिक बिघाड जाहीरपणे स्वीकारत लिहिलं, ‘काल क्राऊडस्ट्राईकच्या एका अपडेटमुळं जभरातील आयटी कार्यप्रणालीवर याचा परिणाम दिसून आला. आम्हाला या बिघाडाची कल्पना असून, आम्ही क्राऊडस्ट्राईकसमवेत सध्या त्या धर्तीवर काम करत असून, जगभरातील युजर्सना तांत्रिकदृष्ट्या मदत देऊ करण्याता आणि त्यांच्या संगणकीय प्रणाली पूर्ववत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत.’
Yesterday, CrowdStrike released an update that began impacting IT systems globally. We are aware of this issue and are working closely with CrowdStrike and across the industry to provide customers technical guidance and support to safely bring their systems back online.
— Satya Nadella (@satyanadella) July 19, 2024
नडेला यांनी ही पोस्ट करताच, टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांनी this gave seizure to automotive supply chain अशा शब्दांत उत्तर दिलं. इथं मस्क नडेलांना निशाण्यावर घेत असतानाच तिथं क्राऊडस्ट्राईकडे सीईओ जॉर्ज कुर्ट्झ यांनीसुद्धा कंपनी हा तांत्रिक गुंता तातडीनं सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा विश्वास देऊ केला. सदर बिघाड हा कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला नसल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली. ‘नेमका बिघाड कुठे आहे, याची कल्पना आली असून, त्यावरील उपाययोजना राबवण्यातही आली आहे.’ असं सांगत त्यांनी सदर अपडेट लागू करत काम पूर्ववत आणण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं.