Plants Make Sounds When Hurt: तुमच्या घरातील कुंडीमध्ये असलेलं रोपटं त्याला पाणी मिळालं नाही म्हणून ओरडतं पण हे ओरडं तुम्हाला ऐकू येत नाही असं तुम्हाला सांगितलं तर? अर्थात तुमची पहिली प्रतिक्रिया 'काहीही काय, वेड वगैरे लागलंय की काय?' अशीच असेल. मात्र हे खरं आहे. खरोखरच झाडं त्यांना त्रास झाला किंवा काही हवं असेल तर आवाज करतात. मात्र हा आवाज मानवाला ऐकू येत नाही. नुकत्याच केलेल्या एका संशोधनामध्ये ही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
वनस्पतींच्या आजूबाजूला धोकादायक वातावरण असेल किंवा इजा झाली अथवा पाणी कमी पडलं तर वनस्पती आवाज काढतात. हे आवाज प्राण्यांना आणि इतर वनस्पतींना ऐकू येतात. अगदी 16 फुटांपर्यंत हे आवाज ऐकू जातात. या आवाजांच्या माध्यमातून वनस्पती एकमेकांशी संवाद साधून आपल्या आजूबाजूचं वातावरण पोषक असेल किंवा इतर वनस्पतींना असा त्रास तर होत नाहीय ना यासंदर्भातील चाचपणी करतात असं अहवालामधून समोर आलं आहे.
वनस्पतींनी त्यांच्या सहकारी वनस्पतींबरोबरच प्राण्यांशी संवाद साधण्याचे अनेक मार्ग तयार केले आहेत. यामध्ये विशेष सुगंध, सौंदर्य, काटेरी पृष्ठभाग, फळे यासारख्या गोष्टींचा ते संवाद साधण्यासाठी वापर करता. मात्र वनस्पती हा संवाद साधताना गोंगाट करत नाहीत. शास्त्रज्ञांनी याआधी वनस्पतींची थेट उपकरणांच्या माध्यमातून चाचणी करुन त्यांच्यामधून निर्माण होणारे ध्वनी रेकॉर्ड केले होते. मात्र हे आवाज ठराविक अंतरावरुन किती दूरपर्यंत जाऊ शकतात याबद्दलची माहिती पूर्वी समोर आली नव्हती.
इस्रायलमधील तेल अवीव विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ इत्झाक खैत यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. या प्रयोगादरम्यान संशोधकांनी तंबाखू आणि टोमॅटोची झाडांमधून निघणारे आवाज रेकॉर्ड केले. हे आवाज 5 मीटर किंवा 16 फूट अंतरावर ओळखता येईल इतक्या उच्च-फ्रिक्वेंसीचे असतात. या संशोधनामध्ये मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला. मशीन लर्निंग टूलच्या माध्यमातून रेकॉर्ड झालेले तणावग्रस्त वनस्पतींचा आवाज अगदी त्या वनस्पतींची मागणी काय आहे हे सांगण्याइतका स्पष्ट होता. एखादी वनस्पती तहानलेली आहे की तिला इजा झाल्याने म्हणजेच एखादा भाग कापल्याने ती त्रस्त आहे हे सुद्धा मशीन लर्निंग टूलद्वारे समजलं इतके हे आवाज स्पष्ट होतं. याच वर्षी मार्च महिन्यात 'सेल' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या परिणामांमध्ये "हे संशोधन वनस्पतींसंदर्भात विचार करण्याच्या पद्धतीत बदल करू शकते. वनस्पतींना आतापर्यंत जवळजवळ शांत मानलं जात होतं," असं म्हटलं आहे.
"आम्ही हा प्रकल्प उत्क्रांतीसंदर्भातील प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सुरू केला होता. हा प्रश्न होता वनस्पती शांत का आहेत?" असं तेल अवीव विद्यापीठातील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आणि अभ्यासाचे वरिष्ठ लेखक लिलाच हॅडनी यांनी 'मदरबोर्ड'ला ईमेलमधून दिलेल्या उत्तरात म्हणाले. "वनस्पतींना ध्वनिक संप्रेषणाचा भरपूर फायदा होऊ शकतो असा आमचा अंदाज होता," असं हॅडनी म्हणाले. वनस्पती आवाज करतात आणि हे आवाज हवेच्या माध्यमातूनच प्रवास करतात असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. "आम्हाला संशोधनानंतर विशेषतः आनंद झाला की हे वनस्पतींचे आवाज नुसते आवाज नसून त्यामध्ये माहितीही आहे. वनस्पतीचा प्रकार आणि ती कोणत्या पद्धतीच्या तणावात आहे याची माहिती या आवाजांमध्ये होती," असं हॅडनी म्हणाले.
मागील संशोधनाने असे सुचवले आहे की वनस्पती पोकळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून आवाज करतात. वनस्पतींमधील पोकळ्यांमध्ये हवेचे फुगे तयार करून आणि तेच फोडून कंपनं उत्सर्जित करू शकतात, असं मानलं जात होतं. याच आवाजांचा नेमका प्रकार काय आहे हे तपासण्यासाठी हॅडनी आणि तिच्या सहकाऱ्यांनी हा प्रयोग केला. त्यांनी जाणूनबुजून टोमॅटो आणि तंबाखूच्या रोपांचा एक तुकडा कापला. तसेच या रोपट्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं. या प्रयोगाच्या निष्कर्षांमध्ये, तणावग्रस्त वनस्पती एका मिनिटाला 50 आवाज निर्माण करू शकते असं दिसून आलं.