श्रीलंकेनंतर आता या देशात हिंसक आंदोलन, राष्ट्रपती भवनात घुसले आंदोलक

श्रीलंकेनंतर या देशात ही आंदोलक थेट राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.

Updated: Aug 30, 2022, 04:51 PM IST
श्रीलंकेनंतर आता या देशात हिंसक आंदोलन, राष्ट्रपती भवनात घुसले आंदोलक title=

मुंबई : आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेत काय सुरु आहे हे संपूर्ण जगापुढे आहे. श्रीलंकेच्या लोकांनी थेट राष्ट्राध्यक्षांच्या घारवर धाव घेतली. त्यानंतर लोकांनी तेथील स्विमिंग पूलपासून राष्ट्राध्यक्षांच्या बेडरुमपर्यंत सर्व गोष्टींची मज्जा घेतली. अशीच एक घटना आता आणखी एका देशात घडली आहे. 

शिया धर्मगुरू मुक्तदा अल-सद्र यांनी सोमवारी राजकारण सोडण्याची घोषणा केली तेव्हा इराकमध्ये राजकीय हालचाली सुरु झाल्या. या घोषणेनंतर लष्कराने कर्फ्यू लागू केला पण अल-सद्रचे समर्थक रस्त्यावर उतरले. एवढेच नाही तर त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने कूच केले आणि ते स्विमिंग पूल आणि हॉलमध्येही घुसले.

सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक

शिया धर्मगुरू मुक्तदा अल-सद्र यांनी राजकारण सोडण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संताप पसरला आणि ते रस्त्यावर उतरले. यावेळी सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. सदरच्या हजारो समर्थकांनी राष्ट्रपती भवनावर धडक दिली. सुरक्षा दलांना रोखण्यासाठी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि गोळीबारही केला, पण त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण झालं होतं.

गेल्या दहा महिन्यांपासून इराकला कायमस्वरूपी पंतप्रधान नाही. मंत्रिमंडळ नाही आणि सरकार नाही. त्यामुळे राजकीय अराजकाची स्थिती निर्माण झाली होती. धर्मगुरु मुक्तदा अल-सद्र यांच्या पक्षाने गेल्या ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या, परंतु बहुमतापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरल्यानंतर इराकमधील सरकारी गतिरोध अधिक तीव्र झाला.

सर्वसहमतीचे सरकार स्थापन करण्यासाठी इराण समर्थित शिया प्रतिस्पर्ध्यांशी वाटाघाटी करण्यास नकार दिला. नंतर हळूहळू हा गोंधळ वाढत गेला. अनेक दशकांच्या संघर्ष आणि निर्बंधांवर मात करण्यासाठी आणि सांप्रदायिक संघर्ष, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हाताळण्यासाठी अल-सद्रने इराकमध्ये आपल्या समर्थकांसह आंदोलन केले आहे. एवढेच नाही तर अमेरिका आणि इराणच्या प्रभावाला विरोध करून त्यांना देशात व्यापक पाठिंबा मिळाला आहे.

याआधीही अल-सद्रच्या समर्थकांनी त्यांना सरकार स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी जुलैमध्ये संसदेत निदर्शने केली होती. मात्र, यावेळीही सदर समर्थकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. त्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि गोळीबारही केला. यादरम्यान अनेकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.