3 डिसेंबर... याच दिवशी पाठवण्यात आलेला पहिला SMS; त्यात काय लिहिलेलं माहितीये?

December Fun Fact : पहिल्यावहिल्या एसएमएसमध्ये काय बरं लिहिलं असेल? कोणी, कोणासाठी पाठवला असेल हा मेसेज? जाणून घ्या एक कमाल गुपित...   

सायली पाटील | Updated: Dec 3, 2024, 09:02 AM IST
3 डिसेंबर... याच दिवशी पाठवण्यात आलेला पहिला SMS; त्यात काय लिहिलेलं माहितीये?  title=
interesting facts First SMS sent in 3 december 1992 what was that

December Fun Fact : मागील दशकभराच्या काळाचा आढावा घेतल्यास जग नेमकं किती वेगानं पुढं आलं, हे पाहताना अवाक् व्हायला होतं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळं जग इतक्या झपाट्यानं बदललं की, हा वेग पाहताना वैज्ञानिकही भारावले. याच वेगाचा एक भाग म्हणजे एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली. सुरुवातीला लखोटे, त्यानंतर रितसर पत्र व्यवहार, पुढे दूरध्वनी, त्यानंतर मोबाईल मेसेज आणि हल्ली, मेल,  व्हॉट्सअप मेसेज वगैरे वगैरे. 

काळ बदलत गेला तसतशा नवनवीन पद्धतींचा वापर होऊ लागला. अनेकांच्या जीवनात पत्राची जागा ईमेलनं आणि व्हॉट्सअप मेसेजनं घेतली. पण, टेक्स्ट मेसेज किंवा एसएमएसची नेमकी सुरुवात केव्हा झाली होती याबद्दल तुम्हाला माहितीय का? 3 डिसेंबर 1992 हा तोच दिवस होता जेव्हा सर्वात पहिला SMS (शॉर्ट मेसेज सर्विस) अर्थात टेक्स्ट मेसेज पाठवण्यात आला होता. 

कोणी पाठवला होता मेसेज? 

22 वर्षीय इंजिनिअर नील पापवर्थनं वोडाफोनच्या नेटवर्कची मदत घेत सहकारी रिचर्ड जार्विसच्या मोबाईलवर हा मेसेज पाठवला होता. 'मेरी ख्रिसमस' इतकंच त्या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं असून, त्यावेळी मेसेज पाठवण्यासाठी पर्सनल कंप्यूटरचा वापर करण्यात आला होता. 

एसएमएसचा नेमका जन्म झाला तेव्हा नील पापवर्थ अँग्लो फ्रेंच आयटी कंपनी सेमा ग्रुप टेलिकॉनसाठी काम करत होते. वोडाफोन युकेसाठी 'शॉर्ट मेसेज सर्विस सेंटर' SMSC विकसित करणाऱ्या टीमचे तेसुद्धा एक सदस्य होते. आश्चर्याची बाब म्हणजे त्या काळात शॉर्ट मेसेजला पेजिंग सुविधेप्रमाणं वापरण्याची योजना तयार करण्यात आली होती. दरम्यान, लंडनच्या एका साईटवर ही प्रणाली सुरु केल्यानंतर पापवर्थ यांनी कंप्यूटर टर्मिनलवरून वोडाफोनचे संचालक रिचर्ड जार्विस यांच्या मोबाईलवर एक संदेश अर्थात मेसेज पाठवला. त्यावेळी जार्विस सुट्टीदरम्यान, एका पार्टीमध्ये सहभागी होत होते असं सांगितलं जातं. 

हेसुद्धा वाचा : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आलं? महाराष्ट्रात किती स्थानके आणि तिकिट दर काय? लेटेस्ट अपडेट जाणून घ्या

 

पहिला मेसेज ही जगासाठी कुतूहलाची बाब असली तरीही पापवर्थ यांनी मात्र आपल्याला तसं वाटत नाही, असंच स्पष्ट सांगितलं. आपण फक्त दीर्घ काळापासून काम सुरू असणारं हे सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करत आहे की नाही याची पडताळणी करत होतो असं त्यांनी सांगितलं. पापवर्थ यांनी पाठवलेला हा पहिला एसएमएस असला तरीही त्यावेळी त्याचं उत्तर देण्याची प्रणाली मात्र विकसित करण्यात आली नव्हती. पण, टेक्स्ट मेसेज क्षेत्रातील ही एक सर्वात मोठी घटना ठरली. 

बरोबर वर्षभरानं नोकियानं एसएमएस सुविधा असणाऱ्या पहिला मोबाईल लाँच केला. सुरुवातीला मेसेजची शब्दमर्यादा 160 अक्षरं इतरी होती शिवाय, मेसेज फक्त एकसारख्याच नेटवर्कवर पाठवला जात होता. विविध नेटवर्कवर मेसेज पाठवण्याची सुविधा 1999 पासून सुरू झाली आणि पाहता पाहता जगभरात या प्रणालीचा वापर सुरू झाला.