बिजिंग : कोरोना व्हायरसने जगभरात घातलेल्या थैमानानंतर आता चीनवर बऱ्याच देशांनी संशय व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर चीनच्या वुहान लॅबची तपासणी अमेरिकेच्या टीमला करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. चीनने मात्र ट्रम्प यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. कोरोना व्हायरसचे आम्ही गुन्हेगार नाही, तर पीडित आहोत, अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे.
अमेरिकेने कोरोना व्हायरसवरुन चीनवर वारंवार टीका केली आहे. शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधला होता. चीनने जाणूनबुजून हे काम केलं असेल, तर याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. 'कोरोनाचं संक्रमण सुरू झालं, तेव्हाच चीनमध्ये ते रोखता आलं असतं. आता संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात सापडलं आहे,' असं ट्रम्प म्हणाले होते.
'खूप दिवसांपूर्वी आम्ही चीनशी बोललो. आम्हाला वुहानच्या लॅबमध्ये जायची इच्छा आहे. तिकडे नक्की काय चाललंय ते आम्हाला बघायचं आहे? चीनने आम्हाला यासाठी आमंत्रण दिलेलं नाही,' असं ट्रम्प यांनी सांगितलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या मागणीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना व्हायरस हा प्रत्येकाचाच शत्रू आहे, असं गेंग शाँग म्हणाले. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे ४१ हजार जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७,६४,००० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. चीनमध्ये कोरोनामुळे ४,६३२ जणांना जीव गमवावा लागला आहे.
'कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यापासून चीनने खुल्या पद्धतीने, जबाबदारीने पावलं उचलली आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आम्ही कडक पावलं उचचली आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायानेही चीनचं यासाठी कौतुक केलं,' अशी प्रतिक्रिया शाँग यांनी दिली.
कोरोना व्हायरसमुळे चीनवर खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी अमेरिकेतल्या राजकारण्यांनी केली होती. यालाही शाँग यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जगामध्ये अशाप्रकारचा खटला चालवता येत नाही, असं शाँग म्हणाले.
'अमेरिकेत २००९ साली एच१ एन १ इन्फ्लुएन्जा सापडला. २००८ साली अमेरिकेत आर्थिक संकट आल्यामुळे जगात मंदी आली. त्यावेळी अमेरिकेला कोणी जबाबदार धरलं का?' असा सवाल शाँग यांनी उपस्थित केला.
ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मेरीस पेनी यांनी कोरोना व्हायरसबाबत आणि याचं मूळ असलेल्या चीनची जागतिक स्तरावर चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. शाँग यांनी पेनी यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. 'ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य निराधार आहे. पेनी यांचं हे विधान चिंतेत टाकणारं आहे. आम्ही त्यांची ही मागणी फेटाळतो,' असं शाँग म्हणाले.