सावधान... पुन्हा आला नवा कम्प्युटर व्हायरस

तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करता? तर मग ही बातमी नक्की वाचा. कारण, सरकारने अलर्ट जाहीर करत एका नव्या कम्प्युटर व्हायरसपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या व्हायरसचं नाव आहे 'लॉकी रॅनसमवेयर'.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 3, 2017, 04:24 PM IST
सावधान... पुन्हा आला नवा कम्प्युटर व्हायरस title=
Representative Image

नवी दिल्ली : तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करता? तर मग ही बातमी नक्की वाचा. कारण, सरकारने अलर्ट जाहीर करत एका नव्या कम्प्युटर व्हायरसपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या व्हायरसचं नाव आहे 'लॉकी रॅनसमवेयर'.

'लॉकी रॅनसमवेयर' हा व्हायरस कम्प्युटरमध्ये शिरकाव करतो आणि त्यानंतर सिस्टम लॉक करतो. त्यानंतर तुमचं कम्प्युटर किंवा लॅपटॉप ओपन करण्यासाठी चक्क खंडणीची मागणी करण्यात येते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अजय कुमार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "आज सीईआरटीने लॉकी रॅनसमेयर व्हायरस पसरत असल्याची सूचना दिली आहे." रॅनसमवेयर एक कम्प्युटर व्हायरस आहे आणि तो जवळपास दिड लाख रुपयांची मागणी करतो.

सायबर स्वच्छ केंद्रातर्फे जाहीर केलेल्या अलर्टमध्ये म्हटलं आहे की, एक स्पॅम ई-मेल प्रसारीत केला जात आहे. या ई-मेलच्या सब्जेक्टमध्ये लॉकी रॅनसमवेयरच्या वेगवेगळ्या प्रकारांचं नाव दिलं जात आहे. हा रॅनसमवेयर ई-मेल अटॅचमेंटच्या स्वरुपात पाठविला जात आहे. सरकारने सांगितलं आहे की, लॉकी रॅनसमवेयर पसरविण्याच्या उद्देशाने जवळपास २३ मिलियन मेसेजेस पाठविले आहेत.

भारताला काय आहे धोका?

भारतात सध्या डिजिटल इंडिया करण्यासाठी जोर लावला जात आहे. त्यामुळे सायबर हल्ल्याचा धोकाही वाढला आहे. ब्रिटनमध्ये रॅनसमवेयर हल्ल्याने राष्ट्रीय स्वास्थ्य सेवेला आपलं टार्गेट बनवलं. जर भारतात अशाप्रकारे सायबर हल्ला झाला तर कोट्यावधी लोक प्रभावित होऊ शकतात.

ही घ्या काळजी

जर तुम्ही जुनी विंडोज ऑपरेटींग सिस्टीम म्हणजेच XP, 8 किंवा विस्टाचा वापर करत आहात तर ते तात्काळ अपडेट करा. मायक्रोसॉफ्टने विशेष सिक्युरीटी पॅच प्रसिद्ध केलेले आहेत.

कुठल्याही प्रकारची ई-मेलमध्ये आलेली रॅर किंवा झीप फाईल उघडण्याआधी निश्चित करा की ही सुरक्षित आहे. तुम्हाला येणारा अनोळखी ई-मेल किंवा लॉटरी संदर्भातील ई-मेलवर क्लिक करु नका.