मुंबई : भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा सगळ्यात विश्वासू खेळाडू चेतेश्वर पुजारा हा त्याच्या संयमी खेळीमुळे जाणला जातो. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला वनडे किंवा टी २० क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही. आयपीएलच्या मागच्या ४ सीजनमध्ये त्याला कोणत्याची संघाने घेतलं नाही. पण त्याच्याबद्दल असा विचार करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुजाराने उत्तर दिलं आहे. गुरुवारी मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सौराष्ट्राकडून खेळताना पुजाराने फक्त ६१ बॉलमध्ये शतक ठोकलं. यावेळी त्याने १४ फोर आणि १ सिक्स ठोकला.
चेतेश्वर पुजाराने या सामन्यात आपल्या खेळीच्या उलट खेळ दाखवला. त्याने यावेळी जलद रन करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यात पुजाराने २९ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.
चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलिया विरुद्ध देखील शानदार खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील मिळाला होता.
२०१९ च्या आयपीएलमध्ये त्याची बेसप्राईस ५० लाख रुपये होती. पण कोणत्याच संघाने त्याला घेतलं नाही. २०१४ मध्ये पुजारा पंजाबकडून खेळला होता. आयपीएलमध्ये पुजाराने ९९ च्या स्ट्राईक रेटने ३९० रन केले आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रेल्वेच्या विरुद्ध शतक ठोकत त्याने हे दाखवून दिलं आहे की तो सर्व फॉरमॅटमध्ये बॅटींग करु शकतो.