साउथम्पटन : क्रिकेटमध्ये बहुतेक कर्णधार एकच टीम घेऊन मैदानात उतरण्यावर विश्वास ठेवतात. पण भारताचा कर्णधार विराट कोहली याला अपवाद आहे. विराट कोहलीनं आत्तापर्यंत ३८ टेस्टमध्ये टीम बदलली आहे. गुरुवारी भारत आणि इंग्लंडमधल्या चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. या मॅचमध्येही विराट टीम बदलेल, अशी शक्यता आहे.
पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा शानदार विजय झाला. त्यामुळे ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-२ नं पिछाडीवर आहे. पण मागची मॅच जिंकल्यानंतरही भारतीय टीममध्ये तीन बदल होऊ शकतात. यातले दोन बदल बॅटिंग आणि एक बदल बॉलिंगमधला असेल, असं बोललं जातंय.
भारताचा ऑफ स्पिनर अश्विनला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे तिसऱ्या टेस्टमध्येही अश्विन बराच वेळ मैदानात नव्हता. चौथ्या टेस्टआधी अश्विननं नेटमध्ये सरावही केला नाही. त्यामुळे अश्विनऐवजी रवींद्र जडेजाला टीममध्ये संधी मिळू शकते. जडेजानं २०१४ साली साउथम्पटन टेस्टमध्ये ५ विकेट घेतल्या होत्या.
फास्ट बॉलर मोहम्मद शमीला नॉटिंगहम टेस्टमध्ये चमकदार कामगिरी करता आली नव्हती. दोन्ही इनिंगमध्ये शमीनं एक-एक विकेट घेतली होती. शमीनं आत्तापर्यंत ३ टेस्टमध्ये ८ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे शमीऐवजी उमेश यादवला चौथ्या टेस्ट मॅचमध्ये संधी मिळू शकते. टीममध्ये ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहची निवड पक्की आहे. तर हार्दिक पांड्या चौथा फास्ट बॉलर असेल.
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन टेस्टसाठी पृथ्वी शॉची टीममध्ये निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यामध्ये भारत ए कडून खेळताना शॉनं ८ मॅचच्या १० इनिंगमध्ये ६०३ रन केले आहेत. १८ वर्षांचा पृथ्वी शॉ ओपनर आहे. पहिल्या दोन मॅचमध्ये भारताचा पराभव झाला तेव्हा भारतीय ओपनर लवकर आऊट झाले. पण तिसऱ्या टेस्टमध्ये शिखर धवन आणि लोकेश राहुलनं भारताला चांगली सुरुवात करून दिली. पण दोघांनाही अर्धशतक करता आलं नाही. त्यामुळे पृथ्वी शॉचा ओपनर म्हणून विराट विचार करू शकतो.
मागच्या मॅचमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेनं अर्धशतक केलं. तर हार्दिक पांड्यानं पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट घेतल्या आणि अर्धशतकही केलं. तर जसप्रीत बुमराहनं शेवटच्या इनिंगमध्ये ५ विकेट घेतल्या. पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या ऋषभ पंतनंही चांगली कामगिरी केली. त्यामुळे या सगळ्यांची निवड निश्चित मानली जात आहे.