Fifa World Cup Win Argentina : फिफा वर्ल्ड कप 2022 (Fifa World Cup) वर लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना (Argentina) संघाने नाव कोरले आहे. अर्जेटिनाच्या विजयानंतर त्यांचे सेलिब्रेशन सुरु आहे. अर्जेटिनाचे भारतात देखील फॅन आहेत, त्यामुळे भारतात देखील जल्लोषात सेलिब्रेशन करण्यात आले होते. या दरम्यान भारतीय फॅन्सना एक प्रश्न खुप सतावत होता, तो म्हणजे भारत फिफा वर्ल्ड कप कधी खेळणार? या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे.
पुढील फिफा वर्ल्ड कप 2026 (Fifa World Cup 2026) मध्ये होणार आहे, अशा परिस्थितीत भारतीय संघ तिथे दिसू शकतो,असे फिफाचे चेअरमन जियानी इन्फँटिनो (Gianni Infantino) यांनी म्हटलेय. या त्यांच्या विधानानंतर भारतीय फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.इन्फँटिनो हे इन्स्टाग्रामवर लाईव्ह आले होते, यावेळी एका फॅन्सने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले.
एका फॅनने भारत फिफा वर्ल्ड कपमध्ये कधी खेळू शकतो? असा प्रश्न इन्फँटिनो (Gianni Infantino) यांना विचारला होता, यावर ते म्हणाले की, 2026 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 32 ऐवजी 48 संघ सहभागी होतील. अशा स्थितीत भारताला पात्र ठरण्याची संधी आहे.
मी भारतीय चाहत्यांना आश्वासन देतो की, आम्ही भारतात खूप गुंतवणूक करत आहोत. एवढ्या मोठ्या देशात फुटबॉलची जोरदार स्पर्धा व्हायला हवी. तसेच, भारताकडे सर्वोत्तम फुटबॉल संघ असावा, असेही त्यांनी नमुद केले आहे.
आगामी 2026 च्या फिफा वर्ल्ड कपचे (Fifa World Cup) संयुक्तपणे यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको भूषवत आहेत. या वर्ल्ड कपमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. कारण या वर्ल्ड कपमध्ये 32 ऐवजी 48 संघ सहभागी होणार आहेत. या वर्ल्ड कपमध्ये 80 सामने होणार असून त्यापैकी बहुतांश सामने अमेरिका खेळणार आहे.
भारताचे फिफा रँकिंग सध्या 106 आहे, याचा अर्थ तो स्वतःहून पात्र होऊ शकत नाही. त्यामुळे भारताला पात्रता फेरीतील अडचणीवर मात करावी लागणार आहे. वर्ल्ड कपमध्ये वेगवेगळ्या संघटनांसाठी संघांचे स्लॉट निश्चित केले जातात, अशा स्थितीत 48 संघ असतील तर आशियाई फुटबॉल संघटनेला 8.5 स्लॉट मिळतील. म्हणजे आशिया खंडातील 8 संघ सहभागी होऊ शकतात
आशियातील संघांमध्ये भारत 19 व्या क्रमांकावर आहे, त्यामुळे त्यांना प्रथम आशिया पात्रता पार करावी लागेल. येथे पुढे जाण्यासाठी, आपल्या गटात टॉप-2 मध्ये असणे आवश्यक आहे. आशियाई संघांना पराभूत करणे हेही भारतासमोर आव्हान आहे, अशा स्थितीत भारताने आशियाई पात्रता फेरी पार केली तरच पुढे जाणे शक्य होईल.
दरम्यान जर खरंच भारत 2026 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये (Fifa World Cup) खेळला, तर भारतीय फुटबॉल फॅन्ससाठी ही पर्वणी असणार आहे.