IPL 2025 ला कधी पासून होणार सुरुवात? 'या' टीममध्ये होणार पहिला सामना, वेळापत्रक आलं समोर

IPL 2025 Schedule : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी टी 20 लीग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 18 व्या सीजनसाठी क्रिकेट चाहते उत्साहित आहेत. आयपीएल संघांनी त्यांच्या सरावाला सुरुवात केली असून स्पर्धेविषयी दररोज नवनवीन माहिती समोर येत असते. यापूर्वी आयपीएल 2025 मार्चच्या 21 तारखेपासून सुरु होणार अशी माहिती मिळाली होती. परंतु आता IPL 2025 सुरु होण्याची तारीख बदलली आहे. 

Pooja Pawar | Feb 14, 2025, 12:28 PM IST
1/7

आयपीएल 2025 मध्ये यंदा देखील 10 संघांचा सहभाग असणार आहे. गेल्यावर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. आयपीएल 2025 साठी नोव्हेंबर महिन्यात सौदी अरेबियामध्ये मेगा ऑक्शन सुद्धा पार पडले. यात 182 खेळाडूंना संघांनी खरेदी केले. 

2/7

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंतवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. 26.75 कोटींची बोली लागलेल्या श्रेयस अय्यरला मागे सोडून ऋषभ पंतवर लखनऊ सुपर जाएंट्सने तब्बल 27 कोटींची बोली लावली. तर त्याच्या खालोखाल केकेआरने व्यंकटेश अय्यरवर 23.75 कोटी खर्च करून आपल्या संघात घेतले. 

3/7

बीसीसीआयचे राजीव शुल्का यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आयपीएल 2025 मार्च 21 पासून सुरु होईल तर याचा अंतिम सामना हा 24 मे रोजी होणार असल्याचे सांगितले होते. 

4/7

परंतु आता क्रिकबझला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मार्च पासून आयपीएल 2025 ला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडेल. तर 23 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडेल.   

5/7

यंदा गुवाहाटी आणि धर्मशाला या दोन ठिकाणी सुद्धा आयपीएल सामने खेळवले जाणार असल्याची शक्यता आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार 26  मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध केकेआर आणि 30 मार्च रोजी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडेल. यंदा धर्मशाळायेथे 3 सामने खेळवले जाणार असल्याची शक्यता आहे. 

6/7

आयपीएल 2025 चा क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना हैदराबाद येथे होण्याची शक्यता आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना हा 25 मे रोजी कोलकाता येथे होईल. 

7/7

मात्र अद्याप आयपीएल 2025 चं अधिकृत वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलेलं नाही. येत्या आठवड्याभरात आयपीएलचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.