www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
शासकीय प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याला बोलावून पार पाडण्याची प्रथा सध्या जोरावर आहे. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच वृत्तीवर आपला आक्षेप व्यक्त केलाय.
शासनाच्या निधीतून राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे हे त्याच भागातील एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीच्या हातून पार पाडली जावीत, असं राज ठाकरे यांचं ठाम मत आहे. यासाठी मनसे सज्ज झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे यापुढे मनसेकडून होणाऱ्या कोणत्याही उद्घाटन समारंभाच्या पत्रिकांवर आणि फलकांवर स्थानिक नागरिकांचंही नाव झळकताना दिसणार आहे.
कल्याण शहरात होणाऱ्या गणेश घाट सुशोभिकरण, मासेमारी जेठीचे भूमिपूजन, अग्निशमन बळकटी करणासाठी पुरविण्यात आलेले आधुनिक साहित्य तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भूमिपूजन सोहळ्याचं नुकतंच मनसेतर्फे आयोजन करण्यात आलं होतं. मनसे आमदार प्रकाश भोईर यांनी या कामासाठी पुढाकार घेतला होता. राज्य शासनानं दिलेल्या सहा कोटींच्या निधीतून ही पार पाडली जाणार आहेत.
साहजिकच, मनसे आयोजित या कार्यक्रमात भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा मान राज ठाकरे यांना देण्यात येईल असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण, राज ठाकरे यांनी मात्र हा मान स्थानिक प्रतिष्ठीत व्यक्तींना दिला.
‘मला सतत बोलायला आवडत नाही. माझे बोलणे म्हणजे एक घाव आणि दोन तुकडे अशा प्रकारचे असते… परंतु मी सतत तुकडे करीत नाही. योग्य वेळी बोलल्यानं त्याचं महत्त्व राहतं... पत्रकारांना प्रश्न पडलेलेच असतात. पण, आज माझ्याकडे त्यांची उत्तरे नाहीत’ असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलंय.
दरम्यान, महापालिका आणि पालिकेतील शिवसेना काँग्रेसच्या नगरसेवकांनी मात्र या कार्यक्रमाला आक्षेप नोंदविला होता. हा कार्यक्रमच अनधिकृत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यावर ‘वेळ येईल तेव्हा नक्कीच या सर्वांची झाडाझडती घेऊ’ असं सांगत राज ठाकरेंनी त्यांचा समाचार घेतला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.