ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची `तारीख पे तारीख`!

देशातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याची विभाजन प्रक्रीया पून्हा एकदा लांबणीवर पडलीय. प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यास विलंब होत असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 16, 2013, 07:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
देशातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याची विभाजन प्रक्रीया पून्हा एकदा लांबणीवर पडलीय. प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यास विलंब होत असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलंय. तर ठाणे जिल्ह्याचे विभाजन हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांच्या राजकारणामध्ये अडकले असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विनोद तावडे ह्यांनी केलीये.
अजितदादांच्या या घोषणेला सहा महिने उलटलीत. तरीही ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा मुहूर्त सरकारला सापडलेला नाही. 1 कोटी 15 लाख लोकसंख्या असलेल्या या ठाणे जिल्ह्यातून चार खासदार आणि 24 आमदार निवडले जातात. तसंच राज्यातल्या सर्वाधिक महापालिकाही याच जिल्ह्यात आहेत. प्रशासकीय सोयीसाठी याचे ठाणे आणि पालघर असे विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे.
नव्या पालघर जिल्ह्यात पालघर, वसई, डहाणू, विक्रमगड, तळासरी, जव्हार, मोखाडा आणि वाडा अशा आठ तालुक्यांचा समावेश असेल. तर ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि मीरा भाईंदर हे तालुके ठाणे जिल्ह्यात असतील
ठाणे जिल्ह्याचं विभाजन करतांना 55 ते 60 शासकीय कार्यालये स्थलांतरीत करावी लागणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा बॅक, जिल्हा परिषदेच्या विभाजनासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल.. ही प्रक्रिया मोठी असल्यानं वेळ लागत असल्याचा दावा महसूल मंत्र्यांनी केलाय. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मतभेदांमुळेच हे विभाजन लांबणीवर पडत असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केलीय

शहरी, निमशहरी आणि आदिवासी अशी वस्ती असलेल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन होण्याची मागणी जुनीच आहे. नागरिकांच्या आणि प्रशासकीय सोयीसाठी ही प्रक्रीया लवकरात लवकर पूर्ण होणं आवश्यक आहे. परंतु सरकारी खाक्यामुळे विभाजनाच्या प्रश्नावर केवळ ‘तारीख पे तारीख’ पडत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.