www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
नोकिया मोबाईलची जादू संपल्यात जमा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी नोकिला अपयश आले आहे. त्यामुळे नोकिया मोबाईल कंपनीने मायदेशी परतण्याचा विचार करीत आहे. कंपनीने देशातून आपला गाशा गुंडाळण्याची धमकी दिली आहे. मूळ फिनलँडची असलेल्या या कंपनीने भारताची बाजारपेठ आता प्रतिकूल झाली असल्याचे कारण पुढे केले आहे.
रुपयाची घसरण आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ‘नोकिया’ या मोबाईल कंपनीने देशातून आपला कारभार आटोपण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. भारतात उत्पादन करण्यापेक्षा चीनमध्ये उत्पादन करून नंतर माल भारतात आयात करणे जास्त चांगला पर्याय आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
भारतात काम करणे अवघड झाले आहे. भारतात राजनैतिक धोका असल्याचे कंपनीने भारत सरकारला पाठविलेल्या अनधिकृत पत्रात म्हटले आहे. यातून भारतीय बाजारपेठेची छबी सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, प्राप्तीकरावरील विवाद आणि ‘वॅट’च्या परताव्यात होणारा उशीर यामुळे ‘नोकिया’ने भारतातून काढता पाय घेतला असण्याची शक्यता आहे.
देशात थेट परकीय गुंतवणुकीत आलेली कमतरता आणि गुंतवणूकदार संस्थांनी आपले हात आखडते घेतले आहेत. त्यातच नोकिया कंपनीने धमकी दिल्याने भारताकडून काय उत्तर येते याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, नोकिया कंपनीचे पत्र कागदावर लिहिलेले नसून तो वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला पाठविलेला केवळ एक संक्षिप्त संदेश आहे. जोपर्यंत कागदावर काही लिहून पाठविल्या जात नाही तोपर्यंत ते अधिकृत समजल्या जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तामिळनाडू सरकार आणि कंपनीच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार सरकार वागले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. या करारानुसार विकल्या गेलेल्या ‘हॅन्डसेट’वर कंपनी ‘वॅट’ अर्थात मूल्यवर्धित कराची चुकवणी करते. त्या रकमेचा ४ टक्के भाग तामिळनाडू सरकारने कंपनीला परत करणे अपेक्षित आहे, असे या संदेशात म्हटलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.