www.24taas.com, सोलापूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणे आणि दौरे ही सगळी भंपकगिरी आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सोलापूर दौऱ्यात लगावला.
कोल्हापुरातून आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरूवात करणाऱ्या राज ठाकरे यांनी पहिल्याच सभेत अजित पवार तसेच जयंत पाटील यांची नक्कल करताना त्यांनी आपल्याला शेतीतील अक्कल शिकवू नये, अशी टीका केली होती. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यात कलगीतुरा सुरू झाला आहे.
दुष्काळातील काहीही न कळणारे लोक भंपकगिरी करत आहेत, अशी टीका करताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मैत्री घट्ट असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दोन्ही पक्ष सलोख्याने राज्य चालवत आहेत. दोघेही गळ्यात गळे घालून काम करत आहोत. एकमेकांविषयी कसलाही द्वेष नसून आमची मैत्री घट्ट आहे. हा सलोखा न मोडण्याची काळजी माध्यमांनी घ्यावी, अशी विनंती अजित पवार यांनी केली.
मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रथमच राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यातील कोल्हापूरच्या सभेत त्यांनी अजित पवारांची नक्कल करताना आम्हाला शेतीतील शिकवू नये, असे सुनावले होते.
त्यावर अजित पवार यांनी त्याला उत्तर देताना नकला करुन प्रश्न सुटत नाहीत, त्यामुळे नौटंकी बंद करुन काम करा, असा सल्ला राज यांना दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना सणसणीत टोला हाणला होता. नक्कल करायलाही अक्कल लागते. अक्कल नसलेल्यांना कुठून नकला करता येणार, असा चिमटा राज यांनी काढला होता.
दरम्यान, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर केलेल्या आरोपांना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. सांगली जिल्ह्यात गृहमंत्री आर. आर. पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते मनसे कार्यकर्त्यांना शाखा काढताना धमकावतात. शिवाय कार्यकर्त्यांच्या घरातल्या माणसांनाही धमक्या दिल्या जातात, असा आरोप कोल्हापूरच्या सभेत राज ठाकरे यांनी केला होता. मात्र मनसे कार्यकर्त्यांना शाखा काढताना कोणीही धमकालेले नाही. उलट अशा शाखा काढताना पदाधिकाऱ्यांना कोणी धमकावत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.