www.24taas.com,मुंबई
अखिल भारतीय नाट्य़ परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत बोगस मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदार कमी आणि मतदान जास्त झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे मतमोजणी रोखण्यात आली. फेरमतदानाची मागणी करण्यात आली असून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल करण्यात आलीय.
अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष निवडणुकीत बोगस मतदानाचा संशय व्यक्त करण्यात येत होता. हा संशय खरा ठरला आहे. मतदार संख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याने गोंधळ झाला. बोगस मतदान झाल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे मतदान थांबविण्याची जोरदार मागणी करण्यात आल्यानंतर अध्यक्ष निवडणूक मतमोजणी थांबविली.
दरम्यान, मतदान गोंधळाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या फेर मतदानाची मागणीही करण्यात आलीय.
निवडणूक मतदान ठिकाणची व्यवस्था पाहिल्यास, एखाद्या राजकीय निवडणुकीलाही लाजवेल असा कडेकोट पोलीस बंदोबस्त या परिसरात लागू करण्यात आलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यानं अनेक पोलिसांना या परिसरात तैनात केलय.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सोळा जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत विक्रमी तब्बल साडेपाच हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. त्यामुळं विजयाचं दान कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता होती. मात्र, मतदानात गोंधळ झाल्याने पुन्हा निवडणुकीची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.