www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टोलच्या मुद्यावरुन राज्यभर तोडफोड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यातल्या सभेला येताना टोल भरणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तशी माहिती दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी टोल भरणार नसल्याचे म्हटले आहे. मुंबईतून पुण्याताला मनसेचे कार्यकर्ते जाणार आहेत. मात्र, आमचा टोलला विरोध आहे. त्यामुळे टोल भरण्याचा प्रश्न येत नाही. आमच्या गाड्या अडविल्या तरी चालतील. पण टोल भरणार नाही, पुढे काय व्हायचे ते होवो, असा इशारा संदीप देशपांडे यांनी झी मीडियाशी बोलताना दिला.
पुण्यातील एस पी कॉलेज मैदानावर उद्या राज ठाकरे यांची सभा होणार आहे या सभेला राज्याच्या विविध ठिकाणाहून कार्यकर्ते पुण्यात दाखल होणार आहेत. त्यामुळं उद्या देखील मनसे कार्यकर्ते टोल न भरताच पुण्यात दाखल होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
दरम्यान, मनसेनेने टोल न भरण्याचा पवित्रा घेतल्याने टोल नाक्यांवर पोलीस बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली आहे. त्याआधी टोलफोड आंदोलन झाल्यानंतर टोल नाक्यावर चार ते पाच पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
टोल नाक्यांवर मनसे कार्यकर्त्यांकडून टोलची मागणी झाली तर पुन्हा एकदा टोल `धाड` होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मनसेची पुण्यातील सभा पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करते की काय याकडे लक्ष आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा>