मनसे आमदार राम कदम यांनी हे कायं केलं ?

निवडणुकांच्या तोंडावर मतांची भरारी घेण्यासाठी राजकारणी काय काय आयडियाच्या कल्पना लढवतील, याचा नेम नाही... आता दहीहंडीफेम आमदार राम कदमांचंच पाहा... मनसेच्या या आमदार महोदयांनी घाटकोपरमधील शाळकरी मुलांना चक्क हेलिकॉप्टरमधून फिरवून आणलं. मात्र बारावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना या हेलिकॉप्टरच्या आवाजाचा त्रास होऊ शकतो, याचं भान त्यांना उरलं नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 21, 2014, 08:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
निवडणुकांच्या तोंडावर मतांची भरारी घेण्यासाठी राजकारणी काय काय आयडियाच्या कल्पना लढवतील, याचा नेम नाही... आता दहीहंडीफेम आमदार राम कदमांचंच पाहा... मनसेच्या या आमदार महोदयांनी घाटकोपरमधील शाळकरी मुलांना चक्क हेलिकॉप्टरमधून फिरवून आणलं. मात्र बारावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना या हेलिकॉप्टरच्या आवाजाचा त्रास होऊ शकतो, याचं भान त्यांना उरलं नाही.
चला तर मग.. तुम्ही जिंकली आहे हेलिकॉप्टर राइड... मनसेचे घाटकोपरचे आमदार राम कदम हे तुम्हाला फिरवून आणणार आहेत... हेलिकॉप्टरमधून.घाटकोपर पश्चिम भागातल्या शाळकरी मुलांची हेलिकॉप्टरमधून उडण्याची हौस तरी आमदार राम कदम यांनी पुरवलीय.. श्रावण बाळाप्रमाणे ज्या मुलांचं वर्तन असेल त्यांना आमदार महोदयांनी हेलिकॉप्टरमधून फिरवण्याचा शब्द दिला होता आणि आता साक्षात रामानं दिलेलं ते वचन असल्यानं ते त्यांनी खरंही करून दाखवलं.
घाटकोपर भटवाडीच्या या दत्ताजी साळवी मैदानात हा वचनपूर्ती सोहळा सुरू असताना, आमदार राम कदम एक गोष्ट मात्र साफ विसरले. याच मैदानाला लागून असलेल्या रत्नभूमी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर सुरू होता. त्यामुळं त्यांनी कार्यक्रमाची वेळ साडे अकराऐवजी दुपारी २ अशी पुढे ढकलली. मात्र १२ वाजून ४०मिनिटांनी याठिकाणी जेव्हा हेलिकॉप्टर लँड झालं, तेव्हा हेलिकॉप्टरच्या आवाजानं विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग पावलीच... परीक्षार्थी डिस्टर्ब झालेच.
नेमकी बारावीची परीक्षा सुरू असतानाच राम कदमांना हेलिकॉप्टर राइडचा कार्यक्रम ठेवण्याची गरज काय होती? गरीब मुलांची हौस बारावीच्या परीक्षेनंतर किंवा सुट्टीच्या दिवशी भागवता आली नसती का? याबद्दल आम्ही जेव्हा त्यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी आम्हालाच उपदेशाचे डोस पाजले.
हेलिकॉप्टर राइडसारखे उपक्रम राबवून राम कदम नव्या पिढीला कोणते आदर्श दाखवतायत? यामुळं राइट ब्रदर्स निर्माण होणार आहेत का? प्रसिद्धीसाठी ऐन परीक्षेच्या काळात असे उपक्रम राबवायचे, ही चमकोगिरी नाही तर काय आहे? यातून कोणतं नवनिर्माण ते घडवणार आहेत ते...?

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.