मुंबई : बॅंकाबाहेरील लांबच लांब रांगाचा फायदा घेवून बनावट नोटा बॅंकेत भरण्याचा प्रकार शहरात उघड झाला आहे. मुंबईतील पायधुनी परिसरांत हा प्रकार उघडकीस आला. पण, बॅंक कर्मचा-यांनी आणि पोलिसांनी वेळीच सावधानता दाखवल्याने त्या बनावट तस्करांचा नोटा बदलीचा आणि बॅंकेत भरण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
धक्कादायक प्रकार म्हणजे यात एका सरकारी कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याचे पुढे आले. देशातील काळा पैसा आणि विशेष करुन बनावट ५००-१००० च्या नोटा चलनातून बाद करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या. या नोटा बंद केल्यानंतर देशभरात ठिकाणी ठिकाणी बॅंकामध्ये ५००-१००० च्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी लांबच रांगा दिसत आहेत.
जुन्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी बॅंकाबाहेरील रांगा आणि यामुळे कामाचा ताण असलेल्या बॅंक कर्मचाऱ्यांचा फायदा घेवून बनावट नोटा बॅंकेत भरण्याची युक्ती दोघांनी शोधून काढली. या दोघा आरोपींपैकी शिवाजी तुकाराम पवार नावाचा आरोपी हा मुंबई पोर्ट ट्रस्टचा कर्मचारी असल्याचे तपासात समोर आले आहे.
दक्षिण मुंबईतील पायधुणी परिसरात असलेली पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बॅंकेत हे दोघे पैसे भरायला गेले होते. इतर सामान्य नागरिकांप्रमाणे यांनी रांगेत उभे राहून पैसे भरण्याचा प्रयत्न केला. पण कॅश काऊंटरवर या तस्करांनी पैसे दिल्यानंतर नोटा मोजण्याच्या मशीनने यांची चोरी पकडली आणि तब्बल १ दोन नाही तर ९३ हजार रुपयांच्या बनावट नोटा हे दोघे भरत असल्याचे बॅंकेतील कॅशियरला कळाले. कॅशियरने मॅनेजरला या प्रकाराची माहिती दिली.
आपली चोरी पकडली गेलीये हे त्या दोघा चोरांच्या लक्षात येताच त्यांनी बॅंकेतून पळ काढला. पण, मुंबई पोलिसांनी यांना शोधून काढले आणि जेरबंद केले. बनावट नोटांच्या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.