विकास गावकर, सिंधुदुर्ग : मराठी माणसाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. भारतात नाही, तर चक्क आयर्लंडमध्ये. पार सातासमुद्रापलीकडच्या आयर्लंडवर झेंडा रोवणारा हा कोकणी मालवणी माणूस आहे तरी कोण?
आसास खय तुम्ही. मालवणी माणूस लवकरच आयर्लंडचो पंतप्रधान व्हतलो. ह्या तुमका खरा वाटना नाय ना. पण ह्या खराच खरा आसा. आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या या मालवणी माणसाचं नाव आहे लिओ अशोक वराडकर. ते मूळचे कोकणातल्या वराड गावचे. अजूनही त्यांचं गावी घर आहे. वराडकर कुटुंबीय कित्येक वर्षांपूर्वी परदेशात म्हणजे आयर्लंडमध्ये स्थायिक झालं, तरी त्यांची नाळ अजूनही गावाशी जुळलेली आहे. लिओ वराडकर अजून एकदाही गावी आलेले नाहीत, पण त्यांचे वडील अशोक आणि आयरीश आई मरियम मात्र अधुनमधून तिथं येतात.
लिओंचे वडील अशोक वराडकर अजूनही मालवणी भाषेतच बोलतात. ते स्वतः डॉक्टर असून, त्यांचं अख्खं कुटुंबच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे लिओ देखील पेशानं डॉक्टर आहेत. आयर्लंडमध्ये मंत्री असलेले लिओ क्रीडामंत्री असताना भारतात क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी आले होते. तिथल्या गे अर्थात समलिंगी चळवळीचे ते खंदे समर्थक आहेत.
आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार म्हणून सध्या त्यांचं नाव चर्चेत आहे. वराड गावात वराडकरांचं खानदानी घर, बागायती आहे. सध्या चुलतभाऊ वसंत वराडकर ती मालमत्ता सांभाळतात. आपल्या लाल मातीतला, नात्यागोत्यातला माणूस आयर्लंडचा पंतप्रधान होणार म्हणून वराडकरी चांगलेच खुशीत आहेत.
2 जूनला लागणा-या निकालाची ते डोळ्यात प्राण आणून वाट पाहतायत. लिओ पंतप्रधान झाले तर त्यांना वराड गावी आणण्याचं आश्वासन त्यांच्या वडिलांनी दिलंय. वराडकरांना आता प्रतीक्षा आहे ती आयर्लंडच्या पंतप्रधानाचे पाय आपल्या गावाला कधी लागणार याची.