पुणे : मॉन्सूनच्या वाटचालीस गती मिळण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. मॉन्सून केरळमध्ये लवकरच दाखल होईल असं सांगण्यात येतं. मात्र केरळसह दक्षिण भारतात पूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शुक्रवारी गडगडाटासह वावटळ होण्याची शक्यता आहे.
साधारणपणे २० मे रोजी पर्यंत अंदमानमध्ये दाखल होणाऱ्या मॉन्सूनचे आगमन यंदा दोन दिवस आधी म्हणजे १८ मे रोजी झाले. त्यामुळे मॉन्सूनची पुढील वाटचालही वेगाने होईल, असा अंदाज होता.
अरबी समुद्रात अनुकूल स्थिती निर्माण न झाल्याने मॉन्सूनची वाटचाल काही दिवस स्थिर होती; पण आता या हालचालीला वेग येत आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे मॉन्सूनचा प्रवास लांबला. साधारणतः २५ मेपर्यंत श्रीलंका व्यापणाऱ्या मॉन्सूनने अंदमानातच तळ ठोकला.
हवामानशास्त्र विभागाने मॉन्सून ७ जूनला केरळात दाखल होईल, असे यापूर्वी दिलेल्या अंदाजात म्हटलं होतं. केरळात मान्सून दाखल होण्यास दोन-तीन दिवस उशीर होण्याची शक्यता आहे, मात्र झपाट्याने अनुकूल वातावरण तयार होत आहे.
सध्या केरळात होणारा पाऊस हा पूर्व मोसमी पावसाचाच एक भाग असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.