दौंड, पुणे : जिल्ह्यात सध्या एका टॉमेटो ज्युसची तुफान चर्चा सुरु आहे. दौंड तालुक्यातील पिंपळगावमध्ये फिरंगी देवीच्या डोंगरावर हा ज्यूस मिळतो. तो ज्यूस पिण्यासाठी या गावात अक्षरशः जत्रा भरते.
चहा नाश्त्याची सोय असलेली छोटी मोठी हॉटेल्स, फेरीवाले-पथारीवाले. दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांनी व्यापून गेलेला परिसर आणि जिकडे बघावे तिकडे लोकांची गर्दी. पिंपळगावात पूर्वी आठवड्यातून दोन दिवस भरणारी ही जत्रा आता आठवड्यातून पाच दिवस भरते. याठिकाणी येणा-या भक्तांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. फिरंगी देवीच्या डोंगरावर लागलेल्या रांगा पाहील्यावर लक्षात येते किती ही गर्दी. प्रत्येकाच्या हातात एक स्टीलचा ग्लास आहे. इथले शेकडो स्वयंसेवक त्या ग्लासमध्ये कुठला तरी पदार्थ वितरित करतायत. तो मिळवण्यासाठी लोकांची जणू स्पर्धाच लागलीय.
हा पदार्थ नेमका काय आहे ? लोक हा पदार्थ ग्लासमध्ये घेतात आणि त्याच ठिकाणी पिऊन टाकतात. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हा पदार्थ दुसरं तिसरं काही नसून साधा टॉमेटो ज्यूस. टॉमेटोचा क्रश करुन तो पाण्यात मिसळण्यात आलाय, आणि तो लोकांना वाटण्यात येतोय. म्हणायला साधा असला तरी हा ज्यूस या लोकांसाठी अमृतरस आहे. हा अमृतरस प्राशन केल्याने त्यांचे दुर्धर आजार बरे झाल्याचा त्यांचा दावा आहे. अगदी साध्या डोकेदुखी पासून डायबेटिसपर्यंत सगळे आजार इथे बरे होतात, असे सांगितले जाते.
विशेष म्हणजे केवळ पुणे-मुंबईतून नाही तर लांबूनही लोक या ठिकाणी येतात. त्यात अशिक्षित, अडाणी, गरिबांपासून उच्चशिक्षित श्रीमंतांचा समावेश आहे. यात सामान्य लोक, इंजिनिअर, गरिब बाई आणि काही हाय क्लास बाया यांचा समावेश आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी हा प्रकार सुरु झाला. कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता पीडीत भक्तांचे लोंढे या डोंगराकडे येतायत. या तीन वर्षात या डोंगर परिसराचं रुपडं पालटलंय हे मात्र खरं. ही सारी किमया त्या अमृतरसाची म्हणजे टॉमेटो ज्यूस आहे. पण या किमयेच्या मागे देखील एक किमयागार आहे. नितीन थोरात हे त्याचं नाव. हल्ली लोक त्यांना महाराज म्हणतात.
विशेष म्हणजे या प्रकरणाची दखल अन्न व औषध प्रशासनाने घेतलीय. इथल्या तथाकथित अमृतरसाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याठिकाणी जे काही सुरु आहे ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर हे सांगणे खरोखरच अवघड आहे. हा टॉमेटो ज्यूस आणि हे नितीन महाराज या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.