मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची याची पत्नी ट्विंकल खन्ना हिनं आत्तापर्यंत अभिनय क्षेत्रातून बाजुला होत इंटिरिअर डिझायनिंग आणि लेखनाकडे आपलसं केलं होतं. पण, आता पुन्हा एकदा ट्विंकल बॉलिवूडमध्ये रिएन्ट्री घेतेय.
ट्विंकल बॉलिवूडमध्ये येतेय पण ती अभिनेत्री म्हणून नाही तर ती स्वत:च प्रोडक्शन हाऊस सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. पती अक्षय कुमार याच्या आगामी सिनेमाचं ती प्रोडक्शन करू शकते. 'ती प्रोड्युसर आहे आणि मी आता तिच्या पगारावर काम करेन' असं म्हणत खुद्द अक्षय कुमारनं ट्विंकलला चिमटा काढलाय.
अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्यासोबत आर. बाल्की एक सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. याच सिनेमाचं प्रोडक्शन ट्विंकल सांभाळू शकते. या सिनेमात आर. बाल्की यांच्या लाडक्या बीग बी अमिताभ बच्चन यांचीही एखादी छोटी भूमिका पाहायला मिळू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाची कॉन्सेप्ट संपूर्णत: ट्विंकलची असेल तर या सिनेमाचं लेखन खुद्द आर. बाल्की करणार आहेतत. हा सिनेमा येत्या मार्च महिन्यापर्यंत समोर येईल. परंतु, या सिनेमात ट्विंकल कोणतीही भूमिका करणार नाही.