लखनौ : लखनौतील अंबर मशिदीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भेट देणार आहेत. भागवत यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल वुमेन लॉ बोर्डाला तसं आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे.
लखनौमधील माधव आश्रमाजवळ असलेल्या नवीन अंबर मशिदीला भेट देण्यासाठी अंबर यांनी भागवत यांना निमंत्रण दिले आहे. मोहन भागवत आणि लॉ बोर्डाचे अध्यक्ष शाइस्ता अंबर यांच्यात भागवत यांची बैठक झाली, त्यावेळी हे आमंत्रण दिले.
भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर दोन्ही समाजातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल. विशेषत: मुस्लिमांच्या मनात संघाबद्दल असलेला द्वेष दूर करता येईल असं मत अंबर यांनी व्यक्त केलं.
अंबर याबाबत माहिती देतांना म्हणाले, 'माधव आश्रमाजवळ नवीन अंबर मशिद बांधली आहे. या मशिदीच्या भेटीसाठी आम्ही भागवत यांना निमंत्रण दिलं असून त्यांनी ते स्वीकारलं आहे. पुढील दौऱ्याच्या वेळी मशिदीला भेट देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे'.