झी २४ तास वेब टीम, नाशिक
इंटरनेटवरील चॅटींग आजचा सगळ्यांची आवडीची गोष्ट. पण हेच चॅटींग किती महाग पडू शकतं. इंटरनेटवरची मैत्री कशी महागात पडते याचा अनुभव सध्या नाशिकमधले मनिष अग्रवाल घेत आहेच. इंटरनेटच्या माध्यमातून मनिष यांची एका तरुणीशी ओळख झाली आणि तिनं मनिष अग्रवाल यांना पावणे तीन लाखांचा गंडा घातला.
त्र्यंबक रोड परिसरात राहणारे मनिष अग्रवाल. त्यांचा संपूर्ण वेळ कागदपत्रांची जमवाजमव करण्यात जातो. एकेकाळी इंटरनेटच्या मायाजालात अडकलेल्या मनिष यांना प्रियंका अवस्थी या तरुणीनं तब्बल पावणे तीन लाखांचा गंडा घातल्याचा त्यांचा आरोप आहे. मनिष यांची फेसबुकच्या माध्यमातून प्रियंकाशी ओळख झाली. त्याचं रुपांतर मग मैत्रीत झालं. मूळची जबलपूरची असलेली प्रियंका शिक्षणासाठी बंगळुरुला असल्याचं तिनं सांगितलं आणि MBA च्या शिक्षणासाठी पैशांची मागणी मनिषकडे केली. मनिषनं तिच्यावर विश्वास ठेऊन दोन वर्षांच्या काळात तिला पावणे तीन लाख दिले.
ज्यावेळी पैसे परत मागितले त्यावेळी अवस्थी कुटुंबियांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. खोट्या गुन्ह्यात अडकवून बंगळुरुमध्ये तुरुंगवासही भोगायला लावल्याचा मनिष यांचा आरोप आहे. प्रियंकाचा भाऊ जबलपूर पोलिसांत असल्यानं स्थानिक पोलीस तक्रार नोंदवायला टाळाटाळ करत असल्याचा मनिष यांचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तरुण वर्गात दिवसेंदिवस चॅटिंगची क्रेझ वाढते. सोशल साईटवर नसणं हे आऊटडेटेड समजलं जातं. पण अशा साईटच्या किती आहारी जायचं, याचा सारासार विचार प्रत्येकानंच करायला हवा.