www.24taas.com, मुंबई
`कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.
भाऊबीजेच्या दिवशी कुठल्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे सांगितलं आहे.
भाऊबीजेची कथा-
यमद्वितीयेला यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. त्यामुळे या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो. त्यामुळे भाऊबीजेला वेगळं महत्व आहे.
एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. असं केल्यास अपमृत्यु येत नाही.
विधी-
अपमृत्यु निवारणार्थ `श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।` असा संकल्प करून तर्पण करावयाचे. हा विधि पंचांगात दिला आहे, तो पहावा.