अमिताभ... `वन मॅन इंडस्ट्री`

‘अमिताभ बच्चन’ या नावानं गेली चाळीस वर्ष भारतीय सिनेमावर अधिराज्य केलं. हा महानायक आज ७१ व्या वर्षात पदार्पण करतोय. शिस्तप्रिय कलाकार, उत्तम माणूस आणि शतकाच्या महानायकाच्या शहेनशाहच्या कारकिर्दीचा हा थोडक्यात आढावा...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 11, 2012, 11:35 AM IST

www.24taas.com, मुंबई
‘अमिताभ बच्चन’ या नावानं गेली चाळीस वर्ष भारतीय सिनेमावर अधिराज्य केलं. हा महानायक आज ७१ व्या वर्षात पदार्पण करतोय. शिस्तप्रिय कलाकार, उत्तम माणूस आणि शतकाच्या महानायकाच्या शहेनशाहच्या कारकिर्दीचा हा थोडक्यात आढावा...
१९४२ साली याच दिवशी जन्माला आला एक महानायक... हरिवंशराय आणि तेजी बच्चन यांचा पुत्र... अमिताभ बच्चन... पित्याकडून आलेली साहित्याची आवड आणि आईकडून मिळालेली रंगभूमीची जाण यांच्या जोरावर अमिताभ यांनी मुंबईची वाट धरली. राजेश खन्ना यांच्या काळात अमिताभ यांना सिनेसृष्टीत जम बसवायला वेळ लागला. भुवन शोम, सात हिंदुस्तानी हे त्यांच्या कारकिर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट... ‘सात हिंदुस्तानी’ सिनेमाने त्यांना पहिलं नॅशनल अवॉर्ड मिळवून दिलं आणि त्यानंतर अमिताभ यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आनंद, बॉम्बे टू गोवा या सिनेमांमधून अमिताभनं आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलं. सत्तरच्या दशकात देशात बदलाचं वारं वाहू लागलं. आणीबाणी मुळे व्यवस्थेविरोधी भावना जनतेच्या मनात पेटत असतानाच अमिताभ नावाच्या झंजावातानं दिला जनतेला ‘अँग्री यंग मॅन’…
जंजीर, कुली, लावारिस, त्रिशूल, खून पसीना, कालिया, काला पत्थर, अग्निपथ, डॉन या सगळ्या सिनेमातून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण आणि वाढती गुन्हेगारी याचं चित्रण झालं. त्यामुळे अमिताभ हिंदी सिनेमातल्या एका नव्या प्रवाहाला निमित्त ठरला. चोरी चोरी चुपके चुरके, मिली, नमक हलाल यांसारखे काही वेगळे सिनेमेही त्यांनी केले. तर सिलसिला, कभी कभी, मुकद्दर का सिकंदर अशा सिनेमांतून अमिताभनं प्रेमाची नवी परिभाषाच बॉलिवूडला दिली.
चाळीशीनंतर अमिताभनं राजकाराणाची चवंही चाखली. मात्र, हा त्यांचा निर्णय साफ चुकला. बॉलिवूडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अमिताभ यांनी मेजरसाब, अक्स, सरकार, एकलव्य, मुहाबतें, बागबान असे चित्रपट केले. ब्लॅक, चिनी कम, अक्स, निशब्द या सिनेमातून त्यांनी अभिनयाची वेगळीच उंची गाठली तर होमप्रोडक्शनच्या ‘पा’ सिनेमाने नवा इतिहास रचला. अभिनयातही आपण ‘पा’ असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं. सत्तरीला आलेल्या अमिताभनं प्रोजेरीया झालेल्या १२ वर्षांच्या मुलाची भूमिका वठवून तमाम प्रेक्षकांना तोंडात बोट घालायला लावलं. या भूमिकेनं त्यांना आणखी एक नॅशनल अवॉर्ड मिळवून दिलं.
आजंही ‘बुड्ढा होगा तेरा बाप’ म्हणत वयाच्या सत्तराव्या वर्षीही अमिताभ यांची वाटचाल सुरुच आहे. सिनेमातूनच नाही तर एक उत्तम सूत्रधार म्हणूनंही ते घराघरातल्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेत ते ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमधून... देशातच नाही तर हॉलिवूडमध्येही अमिताभची क्रेझ पहायला मिळते. ग्रेट गॅट्सबे या त्यांच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूड सिनेमाचीही खूच चर्चा झाली...
जिवंत अभिनय... बुलंद आवाज... धडाकेबाज ऍक्शन... सहज सोपी नृत्यशैली... हटके लूक आणि कामाच्या शिस्तीनं बनलेलं रसायन म्हणजे अमिताभ... मग याला शहेशहा म्हणा... सुपरस्टार म्हणा... किंवा वन मॅन इंडस्ट्री… गेली चाळीस वर्ष याच महानायकानं आपल्या सगळ्यांवर मोहिनी घातलीय. ही मोहिनी अशीच कायम राहो...